आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रतपस्वी  भालजी पेंढारकरांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या 'जयप्रभा'त राज कपूरच्या चेहर्‍याला लागला होता पहिल्यांदा रंग 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः पाच तपांहून अधिक काळ मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत चित्रपटनिर्मिती प्रक्रियेच्या प्रदीर्घ वाटचालीतील साक्षीदार असणारी वास्तू म्हणजे जयप्रभा स्टुडिओ. अवघे आयुष्य समर्पित करून जयप्रभा स्टुडिओ उभारणारे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा आज 25 वा स्मृतिदिन  आहे. 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी या जगाचा कायमच निरोप घेतला होता. भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म 2 मे 1898 रोजी कोल्हापुरात झाला होता.


नाट्यलेखन करीत असताना भालजी पेंढारकर यांनी मुकपटांचे टायटल्स लिहिण्याचे काम केले आणि पुढे स्वतंत्र चित्रपट निर्मितीस सुरुवात केली. वयाच्या 96 व्या वर्षापर्यंत त्यांनी अखंडपणे चित्रपट निर्मिती केली. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीते यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केले. त्यांचे कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत केले. 


भालजी पेंढारकर यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या जयप्रभा स्टुडिओत राजकपूर त्यांच्या शेवटच्या काळात आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी या स्टुडिओची माती आपल्या कपाळाला लावली होती. कारण नट म्हणून त्यांच्या आयुष्यातला पहिला मेकअप या स्टुडिओतच झाला होता.


भालजी पेंढारकरांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या 'जयप्रभा' स्टुडिओविषयी अधिक जाणून घेऊयात... 

  • 'जयप्रभा' स्टुडिओचे केले होते 'प्रभाकर' स्टुडिओ नामकरण...

कोल्हापूरचा आजचा ‘जयप्रभा स्टुडिओ’ आधी 'कोल्हापूर सिनेटोन' आणि त्यानंतर 'प्रभाकर स्टुडिओ' म्हणून ओळखला जात होता. 1934 साली ‘आकाशवाणी’ हा या स्टुडिओत तयार झालेला पहिला चित्रपट होता. त्या काळात या स्टुडिओचे नाव 'कोल्हापूर सिनेटोन' होते. त्यानंतर भालजी पेंढारकरांनी त्यांचा मुलगा प्रभाकरच्या नावाने या स्टुडिओचे नामकरण 'प्रभाकर स्टुडिओ' म्हणून केले होते.  पाच दशकांहून अधिक काळाची पार्श्वभूमी असलेल्या या स्टुडिओचा स्वतःचा एक इतिहास आहे.

  • जाळला गेला होता स्टुडिओ...

1948 साली महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजी पेंढारकर यांचा जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला होता. या स्टुडिओत त्याकाळात नुकतेच तयार झालेले 'मीठभाकर' आणि 'मेरे लाल' हे चित्रपट आगीत भक्ष्यस्थानी पडले होते. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी लाखो रुपये खर्च करुन जयप्रभाला परत उभे केले. 'मीठभाकर' आणि 'मेरे लाल' या चित्रपटांची पुननिर्मिती केली. 'मीठभाकर' या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता.

  • भालजी पेंढारकर यांनी 'मोहित्यांची मंजुळा', 'महारथी कर्ण' यापासून ते शिवचरित्रावरील पावनखिंड, राजा शिवछत्रपतींसह विविध विषयांवरील चित्रपटांची निर्मिती येथेच केली. शिवकाळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. 'साधी माणसे', 'बलिदान' यांसह अनेक चित्रपट याच जयप्रभा स्टुडिओमध्ये निर्माण झाले.

  • कपूर घराण्यामधील भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी जयप्रभा स्टुडिओमध्येच पहिल्या बोलपटात काम केले होते.

  • 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' या नावाने भालजींचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी या वास्तूचीही आत्मकथा लिहली आहे. या आत्मवृत्तातील दोन आठवणींचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. राजकपूर त्यांच्या शेवटच्या काळात कोल्हापूरला आले असताना या स्टुडिओची माती त्यांनी कपाळाला लावली होती. कारण नट म्हणून त्यांच्या आयुष्यातला पहिला मेकअप या स्टुडिओत झाला होता. अभिनेत्री तनुजा 'झाकोळ' या चित्रपटाच्या चित्रणासाठी या स्टुडिओत आल्या असताना त्यांनीही इथली माती कपाळाला लावली होती. कारण त्यांची आई शोभना समर्थ यांचा पहिला मेकअप याच स्टुडिओत झाला होता.

  • 1991 साली भालजी पेंढारकर यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता येणे शक्य नव्हते. म्हणून तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूरमध्ये येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता.

  • पन्नासच्या दशकाच्या शेवटी जयप्रभा स्टुडिओचा डोलारा कोसळू लागला होता. भालजी पेंढारकर यांनी न्यू सिटिझन बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी 60 हजार रुपयांवर गेल्यावर बँकेने स्टुडिओवर जप्ती आणली होती. तेव्हा पैशासाठी मी कोणापुढे हात पसरणार नाही. बँकेने स्टुडिओचा लिलाव करुन आपले देणे वसूल करून घ्यावे, असे भालजींनी जाहीर केले होते. बँकेने 28 ऑगस्ट 1959 रोजी स्टुडिओचा लिलाव केला आणि तेव्हा हा स्टुडिओ लतादीदींनी विकत घेतला होता.

  • मराठी चित्रपटांची पंढरी असलेल्या कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ लता दीदींनी विक्रीस काढल्याने नवाच वाद पेटला होता. कोल्हापुर आणि चित्रपटसृष्टीत त्यावरून प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली होती.