आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये पाऊस-भूस्खलनामुळे २६ मृत्यू, २६ वर्षांत प्रथमच आशियातील सर्वात मोठ्या धरणाचा दरवाजा उघडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- केरळमध्ये पावसाने मोठे थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत पाऊस आणि भूस्खलनामुळे २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ११ जण इडुक्की जिल्ह्यातील आहेत. ढिगाऱ्याखालून २ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. अनेक लोक ढिगाऱ्यांखाली दबले असल्याचे वृत्त आहे. बचाव कार्यात एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांना तैनात केले आहे. एनडीआरएफची चार पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात ४५ सैनिक आहेत. बंगळुरूहून लष्करी तुकडी पाठवली आहे. केंद्रानेही पूरग्रस्त भागात एक चमू पाठवला आहे. कांझीकोड आणि वालायरदरम्यान रूळ वाहून गेल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. इडुक्की, कोल्लम आणि काही इतर जिल्ह्यांत शैक्षणिक संस्थांत सुटी जाहीर करण्यात आली. पावसामुळे राज्यातील ७८ पैकी २२ धरणे ओसंडून वाहिली. त्यांचे दरवाजे उघडावे लागले. २६ वर्षांत प्रथमच आशियातील चेरुथोनी या सर्वात मोठ्या धरणाचे एक दार उघडावे लागले. गुरुवारी सकाळी ५० सेंमी पाणी चेरुथोनी नदीत सोडले आहे. याआधी या धरणाची दारे १९९२ मध्ये उघडावी लागली होती.


कोची विमानतळ खुले...
पेरियार नदीत वाढती पाणीपातळी पाहता कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ जलमय होण्याची शक्यता वाटल्याने विमानांचे लँडिंग रोखावे लागले. दोन तासांनी विमानतळ पुन्हा उघडण्यात आले.  


मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागितली मदत, म्हणाले-असे नुकसान कधीच पाहिले नाही  
केरळच्या एर्नाकुलमच्या पथालम येथील घरांत पाणी घुसल्याने तेथे बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. केरळ अग्निशमन दल आणि बचाव विभाग मोटारबोटच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे. ते म्हणाले की, स्थिती अत्यंत नाजूक आहे. सलग मुसळधार पावसामुळेे २२ धरणांचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे पेरियार नदीला पूर आला आहे. याआधी राज्यात अशी स्थिती कधीच नव्हती.  


उत्तराखंड : १५० पेक्षा जास्त रस्त्यांना भूस्खलनामुळे अडथळा; चारधाम आणि मानसरोवर यात्रेलाही फटका  
उत्तराखंडंध्येही पावसाने थैमान घातले. भूस्खलनामुळे १५० पेक्षा जास्त रस्त्यांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे चारधाम यात्राही रोखावी लागली. ऋषिकेश-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गही एक आठवड्यापासून बाधित आहे. कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान ९ व्या पथकातील ५२ यात्रेकरूंना कालापानी येथे आणि १० व्या पथकातील २५ यात्रेकरूंना तकलाकोटमध्ये रोखले आहे.हवामान विभागाने पुढील तीन दिवसांपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली.

 

अर्धे बिहार राज्य कोरडे, पण राज्यात सरासरी पाऊस
उप्र :
७२ जिल्हे आहेत.१५ मध्ये सामान्यपेक्षा जास्त, ३१ मध्ये सामान्य पाऊस, २२ मध्ये कमी. म्हणजे ३५% भागात कमी पाऊस.  
झारखंड : २४ जिल्हे. ८ मध्ये सामान्य पाऊस. १६ मध्ये सामान्यपेक्षा कमी म्हणजे ७०% भाग दुष्काळाच्या तडाख्यात.  
बिहार : ३८ जिल्हे. १८ मध्येे सामान्यपेक्षा जास्त, २० मध्ये सामान्यपेक्षा कमी. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भागात स्थिती वाईट.  

 

बातम्या आणखी आहेत...