आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवादिन : 26 वर्षीय तरुणाने 5 वर्षांत पार पाडले 132 विवाह 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- गोरगरीब, वंचित, शेतकरी कुटुंबातील कर्त्यासमोर घरातील मुला, मुलीचे लग्न म्हटले की मोठा प्रश्न निर्माण होतो. यामुळे कळत, नकळत कर्जबाजारीपणा ओढावला जातो. भोवताली दिसणाऱ्या या परिस्थितीला बदलण्याचा विचार करत बाळू ताकट हा २६ वर्षीय युवक मागीला पाच वर्षांपासून स्व:खर्च व लोकसहभागातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतो. आतापर्यंत त्याच्या पुढाकाराने १३२ दांपत्य रेशीमगाठीत बांधली गेली आहेत. 

 

माजलगाव तालुक्यातल रोशनपुरी येथील बाळू ताकट याचा माजलगाव येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यात विविध उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच पुढाकार असत. ढोल-ताशा अन् मिरवणुका व्हायच्या. परंतु, शिवाजी महाराजांची जयंती समाजाला उपयोगी ठरावी, अशा पद्धतीने साजरी व्हावी, अशी बाळूची इच्छा होती. त्यानुसार बाळू ताकट व सहकाऱ्यांनी शिव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वर्ष २०१५ पासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यास सुरूवात केली. पहिल्याच विवाह सोहळ्यात २१ जोडपे विवाहबंधनात अडकले. हे सर्वच्या सर्व नवदांपत्य शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार कुटुंबातील होते. एक दिव्यांग दांपत्यही या सोहळ्यात लग्नबेडीत अडकले. आतापर्यंत चार सामुदायिक विवाह सोहळे पार पडले. या माध्यमातून १३२ जोडप्यांचे लग्न झाले. माजलगाव, बीड व शेजारील जिल्ह्यातूनही या विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी झाली होती. दरम्यान, बाळू ताकट व संयोजन समितीने प्रत्येक विवाह सोहळ्यात नवदांपत्यासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये खर्च करून संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. यासह मणी मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, मुलामुलीचा पूर्ण आहेर, दोघांचे चप्पल, बुट, आलेल्या पाहुण्या मंडळींची भोजन व्यवस्था, परण्यासाठी गाडी, घोडा, छायाचित्रण, मेकअप कीट अशी सर्व व्यवस्था अगदी मोफत केली. सन २०१५ मधील सोहळ्यात २१ नव दांपत्यांना रेडीमेड स्वच्छतागृह उपलब्ध करून देत 'स्वच्छ भारत'चा संदेश देण्यात आला. शेतकरी, शेतमजूरांच्या आत्महत्या टाळण्यासाठी, त्यांच्यासमोरील विवंचना दूर करण्यासाठी बाळू ताकट व सहकाऱ्यांनी केलेले काम युवकांना प्रेरणा देणारे ठरत आहे. 

 

बाळू ताकटने सुरू केली शिवजयंतीनिमित्त नवी परंपरा 
दुष्काळी स्थितीत समाजासाठी काही करता येते का? या विचारात होतो. तेव्हा मित्र परिवाराच्या साथीने वंचितांच्या पाल्यांचे लग्न लावण्याचे ठरवले. त्यानुसार मित्र परिवारांच्या साथीने १३२ विवाह पार पाडले. जीवन जगत असताना स्वत:चा समाजाला काही फायदा झाला पाहिजे, या हेतूने हे काम करतो. यंदाही विवाह सोहळा होणार आहे.' बाळू बालासाहेब ताकट, अध्यक्ष, शिव सेवाभावी संस्था, माजलगाव. 

 

बातम्या आणखी आहेत...