आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळ्या झेलून बाबांनी कसाबला जिवंत पकडले, आधीच निर्णय झाला असता तर जास्त आनंद झाला असता : वैशाली ओंबळे

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अतिरेकी कसाबला पकडणाऱ्या शहीद ओंबळे यांच्यासह १४ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई- अंगावर सर्व गोळ्या झेलून बाबांनी कसाबला जिवंत पकडले. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली. बाबांसह २६-११च्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची बाजी लावून शौर्य दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारने पदोन्नती देण्याचा निर्णय घेतल्याने आनंद झाला. परंतु, हा निर्णय अगोदरच घेतला असता तर अधिक आनंद झाला असता अशा शब्दात शहीद तुकाराम अोंबळे यांची कन्या वैशाली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वैशालीने व्यक्त केलेल्या भावना तिच्याच शब्दात...

माझे बाबा तुकाराम ओंबळे यांनी प्राणाची बाजी लावून मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला जिवंत पकडले. कसाब रायफलमधून गोळीबार करीत असतानाही बाबांनी सर्व गोळ्या झेलल्या, परंतु त्यास सोडले नाही. त्याला जिवंत पकडल्यामुळेच सर्व घटनाक्रम उघडकीस आला.


सर्व अतिरेक्यांची माहिती उपलब्ध झाली. माझ्या बाबांसोबतच विजय साळस्कर साहेब, हेमंत करकरे साहेबही या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. या सगळ्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले. कसाबलाही त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. सरकारने कसाबला पकडणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसोबत या हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांचाही यथोचित सन्मान केला.

आज समजले की कसाबला जिवंत पकडणाऱ्या सर्व १४ अधिकाऱ्यांना राज्य सरकारने एक पदोन्नती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खरे तर हा निर्णय अगोदरच जाहीर करावयास हवा होता. जर अगोदर हा निर्णय जाहीर केला असता तर फार बरे झाले असते, त्याचा उपयोग कुटुंबीयांना झाला असता. पण, ठीक आहे. सरकारने उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला त्याचा मला आनंद आहे. आता जे अधिकारी निवृत्त होतील किंवा जे निवृत्त झाले आहेत त्यांना या निर्णयाचा फायदा होईल. मी सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन करते. शब्दांकन : चंद्रकांत शिंदे

तब्बल १२ वर्षांनंतर राज्य सरकारने विधानसभेत केली पदोन्नतीची घोषणा

मुंबई हल्ल्याच्या वेळी अतिरेकी कसाबला जिवंत पकडण्यासाठी प्राणाजी बाजी लावलेल्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ अधिकाऱ्यांना एक पदोन्नती देत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले. तब्बल १२ वर्षांनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. सेनेचे सुनील प्रभू यांनी कसाबला जिवंत पकडणाऱ्या सपोनि मंगेश अनंत नाईक यांच्यासोबत १४ पोलिस अधिकाऱ्यांना किमान एक टप्पा पदोन्नती देण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली होती.