आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल येण्याच्या २७ दिवस आधी पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या ५ दिवसीय दौऱ्यावर गुरुवारी रवाना झाले. दौऱ्याची सुरुवात फ्रान्स भेटीने होईल. त्यानंतर ते यूएई, बहारिनच्या दौऱ्यावर जातील. मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. फ्रान्सच्या बियारेट्ज शहरात २४ ते २६ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या ४५ व्या जी-७ संमेलनातही सहभागी होतील. फ्रान्सने दिलेल्या निमंत्रणावरून भारत संमेलनात सहभागी होणार आहे. २० सप्टेंबर रोजी फ्रान्स भारताला पहिले राफेल लढाऊ विमान देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व आले आहे. हे लढाऊ विमान आणण्यासाठी हवाई दलप्रमुख बी. एस. धनाेआ व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

मोदींनी फ्रान्सला रवाना झाल्यानंतर ट्विट केले. राष्ट्रपती मॅक्रॉन व पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांच्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे. त्याशिवाय अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहंमद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मोदींनी दुसरे ट्विट केले. क्राऊन प्रिन्स व मी बापूंच्या १५० व्या जयंतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक डाक तिकीट जारी करणार आहाेत.
 

ट्रम्प, जॉन्सन, मर्केल यांच्याशी चर्चा
जी-७ संमेलनात मोदी पर्यावरण, हवामान बदल, सागरी क्षेत्रातील सहकार्य, डिजिटल परिवर्तन इत्यादी मुद्द्यावर विचार मांडतील.त्याशिवाय मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मॅक्रॉन व मोदी पॅरिसपासून ६० किमी अंतरावरील शॅटे डी चँटिली शिखर चर्चा करतील.
 

भारत-फ्रान्स मैत्री: दुसऱ्या टर्ममधील मोदींचा आशियाबाहेर पहिला दौरा 
 

रणनीती : भारत-फ्रान्स २१ वर्षांपासून सर्व संकटात साेबत
भारत व फ्रान्स १९९८ पासून सामरिक भागीदार आहेत. दोन्ही देशांत व्यापक संबंध आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांत संरक्षण, सागरी सहकार्य, अंतराळ, सायबर, दहशतवादाच्या विरोधातील लढाई व नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रातील संबंधही बळकट आहेत. फ्रान्स महाराष्ट्रातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा योजनेसाठी सहा आण्विक संयंत्र देऊ इच्छितो. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम दशकभरापासून रखडलेले आहे. भारत सरकार व फ्रान्स यांच्यात डिजिटल टॅक्स व अमेरिकेच्या व्यापारी एकपक्षीयतेसारख्या मुद्द्यावर सहमती आहे. परदेश मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या दौऱ्यामुळे संबंध आणखी दृढ होतील. 
 

कूटनीती : काश्मीरप्रश्नी फ्रान्स उघडपणे भारतासोबत
मोदींचा फ्रान्स दौरा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील आशियाबाहेरील पहिला दौरा आहे. त्यावरून भारत-फ्रान्स संबंध किती दृढ आहेत, हे दिसून येते. हिंदी महासागरात चीन आपला हस्तक्षेप वाढवत नेऊ लागला आहे. या मुद्यावरूनही हा दौरा महत्त्वाचा ठरतो. मॅक्रॉन यांनी भारत दौऱ्यावर असताना हिंदी महासागराच्या सुरक्षेवरून एक करार केला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव हा द्विपक्षीय विषय असल्याचेही फ्रान्सने स्पष्ट केले .
 

संरक्षण : संरक्षण सामग्रीचा पुरवठा करणारा चौथा देश 
हिंदी महासागरातील अनेक बेटांवर लष्करी तळ आहेत. चीनच्या विरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इंडो-पॅसिफिक व्यूहरचनेतही फ्रान्सची भागीदारी आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्चच्या म्हणण्यानुसार रशिया, इस्रायल व अमेरिकेनंतर फ्रान्स संरक्षण सामग्रीचा पुरवठा करणारा चौथा मोठा देश आहे. भारताला पाणबुड्या, मिराज-२०००, एसएम-३९, जहाज प्रतिबंधक क्षेपणास्त्र, मेटिआे, रफाल इत्यादी सामग्री देणार आहे. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...