निवडणुका जवळ असताना एकाएकी ध्रुवीकरणाची लाट तयार करण्याचे भाजपचे प्रयत्न नवे नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशात जेव्हा काही विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असे तेव्हा राष्ट्रवाद उफाळून यावा म्हणून 'नाट्य' घडवून आणण्याचे भाजपकडून प्रयत्न झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असाच एक 'ड्रामा' केला. (योगायोगाने काल जागतिक रंगभूमी दिवसही होता.) आपण राष्ट्राला उद्देशून बोलणार असल्याचे संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून गेले आणि तासभर देश एका तणावपूर्ण परिस्थितीत गेला. २०१६मध्ये मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी भाषण केले होते त्याची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी असताना मोदी देशाला युद्धाच्या खाईत नेणार की राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असल्याचे सांगत लोकसभा निवडणुका रद्द करणार, अशी भीती सामान्यांमध्ये वेगाने पसरली. सोशल मीडियावर तर अफवांना पूर आला होता. पण जेव्हा मोदींनी क्षेपणास्त्र चाचणीबाबत भाष्य केले तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. भारताच्या इस्रो व डीआरडीओने पृथ्वीपासून सुमारे ३०० किमी अवकाशात फिरणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने अवकाशात उद्ध्वस्त केला. हे यश मोदींनी आपल्या भाषणात देशापुढे मांडले. क्षेपणास्त्रांच्या क्षमता व त्यांची अचूकता पाहण्यासाठी अशा चाचण्या अवकाश विज्ञान व संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. त्याविषयी दुमत असता कामा नये. त्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे व संरक्षण दलातील अधिकाऱ्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. पण शास्त्रज्ञांचे यश निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी मिरवणे किती योग्य आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वास्तविक इस्रो व डीआरडीओ या दोन संस्थांमधील शास्त्रज्ञांनी २०११ मध्येच अवकाशातल्या उपग्रहांना क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. हे यश मिळवल्याने भारत त्या वेळी अमेरिका, रशिया, चीननंतर चौथ्या क्रमांकाचा देश बनला होता. पण मोदी सरकार पूर्वीच्या यूपीए सरकारचे हे यश मानायला तयार नाही. त्यांना देशाच्या राजकारणातले महत्त्वाचे मुद्दे केवळ राष्ट्रवादाकडे वळवायचे असल्याने ते कोणतीही मजल मारण्यास तयार असतात. म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासारख्या 'विद्वान' प्रवक्त्यांनी व्यक्त केलेले मत अजबच म्हटले पाहिजे. ते म्हणतात, 'यूपीए सरकार या चाचण्यांना मुद्दामून मंजुरी देत नव्हते. आम्ही ही मंजुरी दिली.' हे असले बाष्कळ युक्तिवाद आजपर्यंत अनेक वेळा केले गेले आहेत. संरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही सरकारपुढे अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्न असतात. त्यासाठी मित्रदेशांची लॉबिंग करावी लागते. भारताच्या आजपर्यंतच्या क्षेपणास्त्र चाचणीसाठी आपण जगाला अगदी जवळच्या पाकिस्तान-चीनला त्याची पूर्वकल्पना देत आलो आहोत. असे आंतरराष्ट्रीय कायदे पाळावे लागतात. पूर्वीच्या वाजपेयी सरकारने अमेरिकेला अंधारात ठेवून अणुचाचण्या केल्या तेव्हा भारतावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले होते आणि भारताच्या अणुचाचणीची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने अणुचाचणी करून दक्षिण आशियाच्या राजकारणात आपलाही देश अण्वस्त्रसज्ज झाल्याचा संदेश सगळ्या जगाला दिला होता. इंदिरा गांधी यांनी पहिली अणुचाचणी केली तेव्हाही आपल्याला काही देशांचा रोष पत्करावा लागला होता. पण त्या वेळची राजकीय परिस्थिती भिन्न होती, ती शीतयुद्धाची होती. जग वसाहतवादातून मुक्त होत होते. ते अमेरिका व सोव्हिएत युनियनमध्ये विभागले गेले होते. आपण अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारून रशियाच्या वॉर्सा गटात सामील झालेले नव्हतो. भाजपच्या प्रचार यंत्रणांना व ज्येष्ठ नेत्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी, इतिहासाशी काही देणेघेणे नसल्याने सत्ताधारी म्हणून आपल्या अशा कृतीने जगापुढे आपली काय प्रतिमा जाते याची त्यांना तमा नाही. दीड वर्षापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आम्हीच करून दाखवले, अशा स्वरूपाची विधाने याच मंडळींनी केली होती. पण नंतर अनेक माजी लष्कर अधिकाऱ्यांनी काँग्रेस सरकारच्या काळातही पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइक केल्याचे म्हटल्यानंतर सरकारचे बिंग फुटले. म्हणूनच कालची उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी निवडणुकांची वेळ साधून केली आहे यात शंकाच नाही. असे प्रयत्न 'साहसी राष्ट्रवादा'ला चेतवण्यासाठीच आहेत हे समजून घेतले पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते हेही पाहणे महत्त्वाचे आहे. वास्तविक पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताचे पाकिस्तान व चीनशी संबंध चिघळले होते. भारताने व पाकिस्तानने एकमेकांच्या सीमारेषा ओलांडल्याही होत्या. त्या वेळी देशभर तयार झालेला युद्धज्वर अमेरिकेने दबाव टाकून आटोक्यात आणल्यानंतर परिस्थिती निवळत असताना मोदी सरकारचे राष्ट्रवादाचे भूत पुन्हा बाटलीतून काढण्याचे प्रयत्न अवाजवी आहेत. क्षेपणास्त्र चाचण्यांची गरज हा वेगळा मुद्दा आहे व त्या केव्हा घ्याव्यात याला अनेक आंतरराष्ट्रीय संदर्भ असतात. कालच्या चाचण्यांची वेळ निश्चितच संशय निर्माण करणारी आहे. म्हणून देशातील सर्व विरोधी पक्ष शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत आहेत, पण मोदींची खिल्ली उडवत आहेत, यातून बोध घेण्यास हरकत नाही.