आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री वसतिगृहात 28 विद्यार्थ्यांना डांबून विवस्त्र करत त्यांची रॅगिंग घेतल्याचा खळबळजनक प्रकार इकरा युनानी महाविद्यालयात रविवारी पहाटे दोन वाजता घडला. संबंधित प्रकार उघडकीस येताच महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ तीन विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले आहे. तसेच, पिडीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यासह केंद्र शासनाच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे मेलद्वारे तक्रार केली आहे.
मुदस्सर मुख्तार इनामदार(वय 19, रा.परभणी) असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव आहे. मुदस्सर हा परभणी येथील राहणारा असून शुक्रवार (11 ऑक्टोबर) रोजी त्याच्या पालकांनी त्याला महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील लेक्चर्स आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी 15 ते 20 सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या 28 विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.
त्यानंतर काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन नंतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केला. सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अॅक्टिंग करण्यास सांगुन नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळखपरेड सुरू केली होती. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच, खिशातील 18 हजार रुपये काढुन घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्याची टास्क देण्यात आली.
विद्यार्थ्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला.
त्यानंतर त्याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन संबधित माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ.शोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना तात्काळ रस्टिकेट केले. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबवला असून त्याची तक्रार त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.