साखरेचा एमएसपी वाढवल्याने / साखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास

वृत्तसंस्था

Feb 20,2019 09:27:00 AM IST

मुंबई- सरकारच्या वतीने साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) सुमारे सात टक्के वाढवून ३१ रुपये किलो करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा नफा ३ ते ४ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे चालू हंगाम वर्ष २०१८-१९ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये कारखान्यांना ३,३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न होणार आहे. जास्त निर्यात मूल्यांमुळे २०० कोटी रुपये आणखी मिळतील. या प्रमाणे ३,५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न झाल्याने साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळणार आहे.

साखर कारखान्यांकडे उस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वाढून २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अतिरिक्त उत्पन्नामुळे यात १८ टक्के घट होऊन १६,५०० कोटी रुपयांवर थकबाकी येणार आहे.

भारतीय मानांकन संस्था क्रिसिल इंडियाच्या वतीने मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार एमएसपी वाढल्याने छोट्या साखर कारखान्यांचा नफा २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, तर मोठ्या साखर कारखान्यांचा नफा १३ ते १५ टक्क्यांच्या दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मोठ्या कारखान्यांच्या उत्पन्नात इथेनॉल उत्पादनामुळेही वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारने इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रोत्साहनात्मक योजनांची घोषणा केली आहे.

मागील तीन वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी सरासरी ९,००० कोटी रुपये आहे. अहवालानुसार किमतीत तेजी आल्याने देशातून निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. या वर्षी साखरेची निर्यात वाढून २५ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीपर्यंत देशातून सात लाख टन साखरेची निर्यात झालेली आहे.

थकबाकी देण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत : पासवान
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत केंद्रीय पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांची चिंता व्यक्त केली आहे. या शेतकऱ्यांची २०,००० कोटी रुपयांची थकबाकी देण्यासाठी राज्यांनी तत्काळ पावले उचलावीत, असेही ते म्हणाले. मंगळवारी पासवान यांनी सांगितले की, यासंबंधी महाराष्ट्र, उत्तर प्रदेशासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने मागील आठवड्यातच साखरेचा एमएससी २९ वरून वाढवून ३१ रुपये प्रति किलोग्रॅम केला होता. मागील आठवड्यातच १३ फेब्रुवारीपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वाढून २०,१६७ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे पासवान यांनी सांगितले होते. यातील ७,२२९ कोटी रुपयांची थकबाकी उत्तर प्रदेशातील आहे. महाराष्ट्रातील ४,७९२ कोटी रुपये, तर कर्नाटकमधील शेतकऱ्यांचे ३,९९० कोटी रुपये थकलेले आहेत.

X
COMMENT