National / अनंतनागमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या टीमवर दहशदवादी हल्ला, 5 जवान शहीद


दोन दहशदवाद्यांनी सीआरपीएफ-पोलिस पेट्रोलींग टीमवर ग्रेनेडने हल्ला केला
 

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 08:27:04 PM IST

कश्मीर- जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दल(CRPF)चे 5 जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रा सुरू होण्या आधीच दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी आज गर्दीच्या रस्त्यावर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही झाली.


चकमकीत आतापर्यंत सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांना एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यशही आल्याची माहिती पोलिसांनी दिली. केपी बस स्टँडजवळील खोऱ्यात एका वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलाच्या गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला चढवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


अनंतनागचे पोलिस निरिक्षकही जखमी
या हल्ल्यात पथकावर ऑटोमॅटिक रायफलमधून अंदाधुंध गोळीबार तसेच ग्रेनेडही फेकले. यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. अनंतनाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरशद अहमद देखील या चकमकीत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले.


अल-उमर-मुजाहिद्दीनने जबाबदारी घेतली
दहशतवादी संघटना ''अल-उमर-मुजाहिद्दीन''ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या दहशतवादी संघटनेने 5 जवानांना मारल्याचा दावाही केला आहे. तसेच असे हल्ले सुरुच राहतील, अशी धमकीही दिली आहे.

X
COMMENT