आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे 3 चॅलेंज v/s राहुल यांचे 3 वार  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप राजपूत / जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी महाराष्ट्रात घेतलेल्या पहिल्याच प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही राज्याशी संबंधित याेजनांचा फारसा उल्लेख न करता कलम ३७०, तिहेरी तलाक व देशभक्ती या राष्ट्रीय मुद्द्यांवरच अपेक्षेप्रमाणे जाेर दिला. मात्र महिला मतदार व विराेधकांसाठी तीन आव्हाने दिली. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील महिलांनी आता पुरुषांपेक्षा जास्त मतदान करून नवा विक्रम प्रस्थापित करावा, तर आम्ही घेतलेले निर्णय पसंत नसतील तर विराेधकांनी कलम ३७० चा निर्णय व तिहेरी तलाकचा कायदा सत्तेवर येताच रद्द करू, असे नुसते आश्वासन तरी त्यांनी घाेषणापत्रात देण्याचे धाडस दाखवावे, असे चॅलेंज त्यांनी जळगावच्या जाहीर सभेमधून दिले.

भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या राज्यात दाेन सभा झाल्या. पहिली जळगावात, तर दुसरी भंडारा जिल्ह्यातील साकाेलीत. पहिल्या सभेची सुरुवात माेदींनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये मराठीतून केली. 'कसं कायं जळगाव, मी बघताेय, महाराष्ट्र महाजनादेश देण्यासाठी सज्ज झालाय, तुम्ही पण महाजनादेश देणार ना? 


मुक्ताई-बहिणाईच्या या पावन भूमीत मी आलाेय....' त्यांच्या या वक्तव्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. तर 'पुन्हा आणूया, आपले सरकार' अशा घाेषणा देत त्यांनी सभेचा समाराेप केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बाेलताना ते म्हणाले की, 'थकलेले विराेधी पक्ष एकमेकांचा सहारा हाेऊ शकत नाहीत, तर राज्याला स्थिर सरकार कसे देणार, महाराष्ट्राची स्वप्ने कशी पूर्ण करणार?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

1 महिलांसाठी : यंदा पुरुषांपेक्षा अधिक मतदान करून दाखवा
2 काँग्रेससाठी : कलम ३७० रद्द करू, असे घाेषणापत्रातून सांगा
3 'तिहेरी तलाक'चा कायदाही रद्द करू असे जाहीर सांगून तर दाखवा

कार्यकर्त्याला कोपऱ्यात ढकलणाऱ्या पवारांना मोदींची 'कोपर'खळी
'नुकताच मी साेशल मीडियावर एक व्हिडिअाे पाहिला. तो खरा की खाेटा माहीत नाही, मात्र त्यात एक माेठा नेता व्यासपीठावर हाेता. सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना उठवले. त्यांना भला माेठा हार घातला जात हाेता. मात्र त्याच वेळी एक सामान्य कार्यकर्ता पाठीमागून डाेकावून पाहत हाेता. कार्यकर्ता सामान्य असल्याने या नेत्याने त्याला अक्षरश: काेपराने धक्का देऊन मागे सारले,' असे सांगताना माेदींनी ती अॅक्शन करून दाखवली. स्वत:च्या कार्यकर्त्यालाही धक्के देणारा हा नेता तुम्हा मतदारांची काय काळजी घेणार?'

अकोल्याच्या बाळापुरात सभेत हार घालताना मध्येच घुसणाऱ्या एका कार्यकर्त्याला पवारांनी कोपराने मागे ढकलले होते. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्याच्याच संदर्भाने मोदींनी पवारांना कोपरखळी मारली.

जुन्याच याेजनांची पुन्हा नव्याने उजळणी
४० मिनिटांच्या भाषणात माेदींनी फडणवीस यांच्यावर काैतुकाचा वर्षाव केला. तसेच 'प्रत्येक गरिबाला, महिलांना पंतप्रधान आवास याेजनेत सन २०२२पर्यंत घर, पीक विमा याेजना, सन्मान याेजनेत थेट खात्यात पैसे, साडेतीन लाख काेटींच्या जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला पेयजल पुरवू', अशी ग्वाहीही दिली.

विदर्भात निरस भाषणाने गर्दीची निराशा
साकाेलीतील (जि. भंडारा) माेदींच्या भाषणाने गर्दीची निराशा केली. फक्त शासकीय याेजनांची उजळणी करताना माेदींनी एकही राजकीय टिपण्णी केली नाही, त्यामुळे हे भाषण निरस ठरले. गोसेखुर्दमुळे सिंचनाचा माेठा लाभ झाला, असे माेदी म्हणाले. पण प्रत्यक्षात फारसा फायदा झाला नसल्याचे उपस्थित सांगत हाेते.

मंदार जाेशी, अनिल पाैलकर, अशाेक अडसूळ |लातूर/ मुंबई : लाेकसभेच्या अपयशापासून प्रकाशझाेतातून दूर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मतदानाच्या आठवडाभर आधी महाराष्ट्रात अवतरले. औशात  (जि. लातूर) व मुंबईत रविवारी त्यांच्या सभा झाल्या. ' डाॅ. मनमाेहन सिंग यांनी देशाची जी आर्थिक घडी घातली हाेती, तिचा माेदींनी सत्यानाश केला. पुढील सहा महिन्यांत आणखी वाईट परिस्थिती येईल. हे अपयश झाकण्यासाठी ते कलम ३७० वर बाेलतात. मंदीमुळे अनेक कंंपन्या बंद पडल्या, हजाराे राेजगार बुडाले,' असा आराेप त्यांनी माेदी सरकारवर केला. तसेच, चंद्रावर राॅकेट साेडून पाेट भरते का, असा सवालही त्यांनी केला.

अाैशातील सभेची सुरुवातच राहुल यांनी 'माेदी स्टाइल' केली. 'कसे आहात, मूड चांगलाय का? बेरोजगारी गेली का? रोजगार मिळाला का? , शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले का? , अच्छे दिन आले का?' असे प्रश्न विचारत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गर्दीतून नाही... नाही असे उत्तर मिळाले.

1 माेदींनी विस्कटली आर्थिक घडी, पुढचे सहा महिने बिकट
2 दाेन हजार कंपन्या मंदीने गुंडाळल्या; अनेक राेजगार गेले
3 १५ उद्योजकांना ५.५० लाख काेटींची माफी


चंद्रावर रॉकेट पाठवून पोट भरत नाही
'राफेल'चा काटा चुभता है
...
'कोणता संरक्षण मंत्री विमान आणायला जातो?,' असा प्रश्न उपस्थित करत राहुल म्हणाले, 'रफाल लढाऊ विमान खरेदीत मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे. त्याचा काटा बीजेपी को चुभता है, इसलिए राजनाथ सिंह रफाल लाने को खुद फ्रान्स गये थे', असा आरोप त्यांनी केला.

घुसखाेरीबाबत चीनला का विचारले नाही?
चीनच्या राष्ट्रपतींसाेबत माेदी चहा पिले, मात्र डोकलाम येथे चिनी सैन्य घुसखोरी का करतेय,' असे माेदींनी त्यांना विचारले नाही, असा टाेलाही राहुल यांनी लगावला. दरम्यान, 'चाैकीदार चाेर है'च्या घाेषणांनी कार्यकर्त्यांनी भाषणाला दाद दिली

आराेपांच्या फैरी
- मनरेगा योजनेसाठी सरकार फक्त ३५ हजार कोटी रुपये देते, मात्र अदानी, अंबानीसारख्या १५ उद्योजकांचे ५ लाख ५० हजार काेटींचे कर्ज माफ करते.
- शेतकरी आत्महत्या, नोटबंदीवर संसदेत जाब विचारला, मात्र माेदी उत्तर देत नाहीत. जगभर फिरत मात्र खाेटे रेटून बाेलतात.
- 'अर्थमंत्री म्हणतात जीएसटी कायदा आहे, त्यात बदल करता येत नाही. मग मनरेगा, मध्यान्ह भोजन हे कायदे कसे बदलले?'
- जीएसटी आणि नोटाबंदीमुळे देशाचे माेठे नुकसान झाले. माध्यमांना मात्र हे दिसत नाही. सरकार तर स्वत:चीच पाठ थाेपटून घेण्यात मग्न आहे.