आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रवी'चा वार : बीड जिल्ह्यात उष्माघाताने २४ तासांत ३ मृत्यू, अकोला @४७.२; परभणीत १०० वर्षांतील उच्चांक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/ बीड/औरंगाबाद - रविवारी मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात सूर्य कोपलेला राहिला. शनिवारी देशात सर्वोच्च तापमान नाेंदल्या गेलेल्या अकोलासह चंद्रपूरमध्ये पारा ४७.२ अंशावर होता. दरम्यान, उष्णतेच्या लाटेने मराठवाड्यातही काहिली माजली असून बीड जिल्ह्यात चोवीस तासांत उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, परभणीत ४७.२ सेल्सियस अंश तापमानाची नोंद झाली असून हा गेल्या शंभर वर्षांतील उच्चांक आहे. विदर्भात अकोला-चंद्रपूर प्रचंड तापलेले असताना इतर शहरांतही पारा ४५ अंशाच्या जवळपास होता. हवामान खात्यानुसार, उष्णतेची ही लाट अकोला जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. 


सलग तीन दिवसांपासून औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर : 
औरंगाबादमध्ये सलग तीन दिवसांपासून पारा ४३ अंशाच्या वर आहे.  शुक्रवारी ४३, शनिवारी ४३.७ आणि रविवारी ४३.६ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले. याचा परिणाम बाजापेठांसह पर्यटन उद्योगावरही झाला आहे. 

 

बीड : कदमवाडी, बहिरवाडी येथे दोघांचा, बनसारोळ्यात एकाचा मृत्यू
बीड - परमेश्वर दादाराव वाघ (रा. कदमवाडी ता. बीड) रविवारी शेतात काम करत असताना कोसळले. तर बहिरवाडी जि. प. शाळेतील शिक्षक चंद्रकांत मारोती हिरवे (४०) चक्कर येऊन पडले व त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद पोलिसांत करण्यात आली. तिसऱ्या घटनेत पोस्टमन विक्रम भीमराव गायकवाड (३८,रा. बनसारोळा ता. केज) शनिवारी घरी परतले. पाणी प्यायल्यानंतर त्यांना चक्कर आली. यातच त्यांचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...