आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात २४ तासांत ३ शेतकरी आत्महत्या; दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/पाटोदा/गेवराई - जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी स्थिती तिव्र होत असून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी खचून जात आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मरण जवळ करत आहेत. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांची यात्रा जिल्ह्यातून बाहेर पडत नाही तोच माजलगाव, पाटोदा व गेवराई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 

माजलगाव तालुक्यातील इरला येथील सिताराम धोंडीबा हजारे (७०) या शेतकऱ्याने नापिकी व मुलावर असलेल्या कर्जाच्या चिंतेत २६ ऑगस्ट रोजी विष घेतले होते. मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या नावे तीन एकर शेती असून त्यांनी जिल्हा बँकेचे ५० हजार, एसबीआयचे १ लाख ६० हजार, एका खासगी बँकेचे ९० तर एका फायनान्स कंपनीकडून दीड लाखांचे असे एकूण साडेचार लाखांचे कर्ज घेतले होते. व्याजासह त्याची रक्कम सुमारे सात लाख रुपये झाली होती. यामुळे मुलगाही तणावात होता सिताराम यांनी याच तणावातून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 
 

आत्महत्येची दुसरी घटना पाटोदा तालुक्यात घडली. सुदाम भाऊराव कदम  (३८, रा. सौदाना) यांनी नापिकी, कर्ज आणि मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून  बुधवारी सकाळी चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. भाऊराव कदम यांच्या माहितीवरून पाटोदा पोलिसांत नोंद करण्यात आली. 
 

अर्धपिंपरीत शेतकऱ्याने घेतले विष 
दरम्यान, आत्महत्येची तिसरी घटना गेवराई तालुक्यातील अर्धपिंपरी येथे घडली. बंडू अर्जुन मदने (४०) यांनी मंगळवारी सायंकाळी शेतात फवारणी करताना विष घेतले. त्यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती असून सध्या शेतात कापूस, बाजरी ही पिके आहेत पावसाअभावी सुकून जाणारी पिके, कर्जबाजारीपणा यातून त्यांनी विष घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.