आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - जिल्ह्यात केज, आष्टी व वडवणी तालुक्यात २४ तासांत झालेल्या या तीन अपघातात २ ठार, सात जण जखमी झाले. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार १ जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात केज -नांदूरघाट रस्त्यावरील नांदूरघाट शिवारात मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. दुसऱ्या अपघातात मोबाइलवर बोलत असताना ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स झाडावर आदळून सात जण जखमी झाले. हा अपघात बीड-धामणगाव-नगर मार्गावरील आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडीजवळ मंगळवारी पहाटे दीड वाजता घडला. वडवणी -तेलगाव मार्गावरील मोरवड शिवारात सोमवारी दुपारी तीन वाजता घडलेल्या तिसऱ्या अपघातात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबलेल्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला.
केजमधील शिरूर घाटचे सतीश छंदर घोडके (४५) यांच्याकडे त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरूंद (६५, रा. डोंगरेवाडी ता. वाशी, जि. उस्मानाबाद ) हे भेटण्यास आले होते. मंगळवारी रात्री ७.३० च्या सुमारास घोडके यांच्या दुचाकीवर (एम.एच.१२ सीएस ९६५४)पाठीमागे बसून केशव कुरुंद हे दोघे शिरूरघाटहून नांदूरघाटकडे जात होते. केज -नांदूरघाट रस्त्यावरील नांदूरघाट शिवारात माळी यांच्या गाेठ्याजवळ केजकडे जाणाऱ्या कारने (एम.एच.२३ ई ९४५०) दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार सतीश घोडके यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागील केशव कुरुंद हे गंभीर जखमी झाले. कार चालक घटनास्थळी कारसह पसार झाला. नांदूरघाट पोलिस चौकीचे जमादार मुकुंद ढाकणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
सोहळा अटोपून जाणारी ट्रॅव्हलस् झाडावर अदळली
बीड | बीडहून लग्न सोहळा आटोपून खासगी ट्रॅव्हल्स ( एम.एच.२३ जे -८००) पुण्याकडे जात हाेती. दरम्यान, मोबाइलवर बोलत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. या अपघातात सात जण जखमी झाले असून पाच किरकोळ, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बीड-धामणगाव-नगर मार्गावरील म्हसोबावाडीजवळ (ता. आष्टी) मंगळवारी पहाटे दीड वाजता घडला.
वडवणी तालुक्यात कारच्या धडकेत ट्रॅक्टरचालक ठार
वडवणी | ट्रॅक्टर चालक गोरख नांदे सोमवारी दुपारी वडवणी- तेलगाव रस्त्यावरून ट्रॅक्टरमधून (एम.एच. ४४ एस २५९३) ऊस घेऊन तेलगाव साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान, मोरवड शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.१२ एफ. झेड. १६४५) ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या वेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली दबून गोरख नांदे याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ तात्या मोहन नांदे यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.