आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांनो स्वत:चे हृदयही सांभाळा! सोलापूरच्या रिंगणात ३०% उमेदवार हृदयरुग्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनिवास दासरी 

साेलापूर - विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या साेलापुरातील बहुतांश उमेदवारांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तरी मतदारांना जवळ करण्यासाठी त्यांच्या हृदयापासून हाका सुरू झाल्या. प्रतिस्पर्ध्यांचे आराेप परतवताना घसाफाेड करू लागले. घराेघरी पाेहाेचण्यासाठी धावत्या पदयात्रा निघू लागल्या. ऊन नाही, पाऊस नाही. डोळ्यासमोर फक्त मते अन् मतेच... अशा धगधगीत ताण वाढू नये म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्याची निवडणूक जिंकल्यासारखे आहे, असा सल्ला हृदयराेगतज्ज्ञांनी िदला आहे. 

‘दिव्य मराठी टीम’ने केलेल्या पाहणीत सोलापुरातील ११ विधानसभा मतदारसंघात १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आले. पैकी ८४ अपक्ष तर ७० जण पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवारांना हृदयाचा त्रास आहे वा झालेला आहे. प्रमुख पक्ष आणि त्यांच्या बंडखोर उमेदवारांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून येते. परंतु इर्ष्येला पेटलेली ही मंडळी ‘अब नहीं तो कभी नही’ अशा निर्णायक टप्प्यावर आलेली आहेत. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी साऱ्यांनीच जबरदस्त तयारी केली. ‘होम टू होम’ प्रचार करण्यासाठी त्यांची अक्षरश: भटकंती सुरू झाली आहे. यंत्रणा सक्षम असली तरी प्रत्येक गोष्टीत उमेदवाराला लक्ष घालावेच लागते. कार्यकर्त्यांना सांभाळणे, पदयात्रेत लोकांना गोळा करणे, त्यांना आणणारे कंत्राटदार पोसणे, स्टार प्रचारकांची खिदमत ठेवणे अशा सर्व बाबींच्या केंद्रस्थानी उमेदवारच आहे. 
 

सहचारिणींनाच काळजी
या एकूण लगबगीत हृदयरुग्ण उमेदवारांचे वेळेत जेवण नाही, गोळ्या नाहीत, पुरेशी झोप नाही. सतत धगधग असल्याने ताण येण्याचा धोका वाढलाय. त्यांची काळजी मात्र सहचारिणींनींच घेतलेली दिसून येते. त्या सतत साहेबांच्या ‘पीए’शी संपर्कात असतात. साहेबांचा ताण कमी करण्यासाठी हळदी-कुंकू, घेऊन घरातल्या महिला बाहेर पडल्या.
 

शहरी हृदयेच कमकुवत
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी निवडणूक मैदानात आलेल्या पंढरपूरच्या सुधाकर परिचारकांना रक्तदाब किंवा मधुमेह नाही. भारत भालके यांना किडनीचा त्रास आहे. पण दोघांचे हृदय आजही जिंदादिल. दिलीप सोपल तर सदाबहार. सुभाष देशमुख, महेश कोठे, आडम मास्तर यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे.
 

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय अंधारे म्हणतात...
सकाळी ७ ते ९ वेळेतच मतदारांच्या भेटी घ्याव्यात. उन्हात जाण्याचे टाळावे. ठरल्या वेळीच जेवण, गोळ्या घ्या. शहाळाचे पाणी प्या, पेढा नको. पुरेशी झोप घ्या. पहाटे उठलेले असाल तर दुपारी थोडी विश्रांती घ्या. आक्रमक भाषणे टाळा, जोरात शब्दफेकीने ताण येतो.