आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून ३०% पात्र शेतकरी वंचित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी 

नागपूर - शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत म्हणून वर्षाला ६ हजार रुपयांची रक्कम जमा करण्याच्या केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी अत्यंत सुमार पद्धतीने सुरू आहे. योजनेचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता फक्त ६९% शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा झाला. याचा अर्थ ३०% शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप या योजनेचा पहिला हप्ताही जमा नाही. तर योजनेला वर्ष होत असताना जेमतेम ५०% कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने योजनेची घोषणा केली होती. शासकीय नोकरदार, आयकर दाते, लोकप्रतिनिधींना योजनेचा लाभ मिळणार नाही, हा नियम असल्याने राज्यात ८७ लाख ७० हजार शेतकरी पात्र ठरले. १ डिसेंबर २०१८ पासून अंमलबजावणी सुरू झाली. एप्रिल ते जुलै या चारमाहीत ५१ लाख ९० हजार (५८%) खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाली. तर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान केवळ २० लाख ४८ हजार (२३ %) शेतकऱ्यांच्या खात्यात रकमेचा तिसरा हप्ता जमा होऊ शकला आहे.
 

२३% शेतकऱ्यांनाच लाभ
डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या योजनेच्या पहिल्या चार महिन्यांतच २ हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करायचा होता. प्रत्यक्षात ६० लाख ३७ हजार (६९ टक्के) खात्यातच २ हजार रुपये जमा होऊ शकले. याचाच अर्थ ३० % शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा नाही.
 

खातेदारांचा डाटा दोषपूर्ण
बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेला खातेदारांचा डाटा दोषपूर्ण अथवा चुकीचा असल्याचा दावा कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी केला. डाटामध्ये सुधारणा करण्याचे काम रेंगाळले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितले जात आहे.