आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - अल्पवयात वाईट संगतीमुळे मुले कुठल्या थराला जातात याचा नेम नाही. अशाच एका घटनेत मुलाने मौज-मजा करण्यासाठी आईचे तब्बल ३० तोळे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार सरकारवाडा पोलिसांनी उघडकीस आणला. या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडून कार व २२ तोळे सोने हस्तगत केले. या घटनेत आईला दागिने मिळाले; मात्र आपला खरा दागिना खोटाच निघाल्याचे दु:ख या मातेच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.
पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन वाहनात बसवत असताना, 'त्याला माफ करा, मारू नका', असे अार्जव त्या माउलीने केल्याने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गहिवरून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकरोडवरील एका घरातून सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी एका महिलेने सरकारवाडा पोलिसांत तक्रार दिली होती. तपास सुरू असताना महिलेच्या मुलाच्या वागण्या-बोलण्यात पोलिसांना फरक जाणवला.
त्याच्या मित्रांना विश्वासात घेत माहिती घेतली असता संशयित मुलाने आई आजारी असल्याचे सांगत दोन-तीन जणांना दागिने विकल्याचे निष्पन्न झाले. पथकाने दागिने जप्त केले. संशयित मुलाने मित्रांच्या मदतीने जुनी कारही विकत घेतली होती. पथकाने चौकशी केली असता त्याने घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली. दोन मित्रांनी मदत केल्याची माहितीही त्याने दिली. पथकाने ५१ हजारांची रक्कम, कार आणि २२ तोळे सोने असा पाच लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक संदीप भालेराव, राजेंद्र शेळके, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, सुनील जगदाळे, सुरेश शेळके, गणेश वाघ, सुभाष सहाणे, धनंजय शिंदे, अरुण भोये, दीपक निकम यांच्या पथकाने फिर्यादी महिला आणि मुलास त्रास होणार नाही याची खबरदारी घेत हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला. अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले.
मुलाचे पितृछत्र हरपल्यानंतर अाई करते खासगी नाेकरी...
पित्याचे छत्र हरपल्याने मुलाच्या उच्च शिक्षणासाठी महिला खासगी कंपनीमध्ये काम करते. एकुलता एक मुलगा उच्चशिक्षित हाेण्यासाठी नामांकित शाळेत त्याचा प्रवेश घेतला. मात्र वाईट संगतीमुळे त्याने घरातच चोरी केल्याचे दु:ख त्या माउलीला लपवता अाले नाही. महिलेने पोलिस अधिकाऱ्यांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'त्याला माफ करा, मारू नका', असे सांगत मुलाला जवळ घेतले. आईची ही माया पाहून पोलिस अधिकाऱ्यांसह तपासी पथकालाही गहिवरून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.