आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लिगो इंडिया'साठी ३०० हेक्टर जमिनीचे हस्तांतरण, पंतप्रधान करणार भूमिपूजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- आशिया खंडातील पहिला आणि जगातील तिसऱ्या लिगो प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार वर्षांपासून लिगो प्रकल्पाचे काम प्रलंबित असून आज घडीला या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन १०० टक्के अधिग्रहीत झाली असल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली इस्रो, आयुका आणि नासा या संस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत. 

 

अमेरिकी अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि आयुका यांच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका सरकार ब्रह्मांड ध्वनीचा अभ्यास करण्यासाठी लिगो प्रकल्प औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा, सावळी, अंजनवाडा आदी गावांच्या क्षेत्रात स्थापन करणार आहे. या प्रकल्पाला तीन वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली असून सुमारे ३०० हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन वन, महसूल विभाग आणि खासगी मालकीच्या शेतकऱ्यांकडून शासनाच्या वतीने अधिग्रहीत करण्यात आली आहे. जमीन अधिग्रहण करून संबंधितांना त्याचा मावेजा देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन लिगो इंडिया प्रकल्पाकडे शक्य तितक्या लवकर हस्तांतरित करण्याच्या सूचना अणुऊर्जा आयोगाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही सर्व जमीन लिगो इंडिया प्रकल्पाच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांत सर्व जमीन या प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभावित दौरा फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता असून फेब्रुवारी महिन्याच्या २० ते ३५ तारखे दरम्यान त्यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्याबाबत भाजप नेत्यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. 

 

काय आहे लिगो प्रकल्प? : तेथे कशाचा अभ्यास होणार? 
लिगो या संक्षिप्त शब्दाचा अर्थ लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह‌्ज ऑब्झर्व्हेटरी असा आहे. ही एक प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळेमध्ये ब्रह्मांड ध्वनींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचा मूळ हेतू, विश्वाची निर्मिती कशी झाली, हे संपूर्ण विश्व काय आहे, विश्वाचा मूलाधार काय आदी कुतूहल निर्माण करणारे कोडे सोडवणे हा आहे. अशा प्रकारच्या प्रयोगशाळा अमेरिकेत हॅनफोर्ड आणि लिव्हिंगस्टोन या ठिकाणी आहेत. जगामध्ये आज घडीला या केवळ दोनच प्रयोगशाळा असून तिसरी प्रयोग शाळा भारतात आणि महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात होत आहे. या प्रयोगशाळेसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील भूपृष्ठाचा अभ्यास करण्यात आला होता. शेवटी लिगो इंडिया प्रकल्पाने औंढा नागनाथ तालुक्यातील ही जागा पक्की केली. 

 

अमेरिकेच्या धर्तीवरच प्रकल्प 
अमेरिकेतील हॅनफोर्ड आणि लिव्हिंगस्टोन येथील प्रकल्पांच्या धर्तीवरच हिंगोलीतील लिगो प्रकल्पाची उभारणी होईल, अशी माहिती या प्रकल्पाच्या जागा पाहणीसाठी आलेल्या इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. अद्याप या प्रकल्पाचे संकल्पचित्र तयार नसले तरी त्यावर काम सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

 

प्रत्यक्ष कामाचे लवकरच होणार भूमिपूजन 
या प्रकल्पाकडे सर्व जमीन येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रमाची रूपरेखा ठरली नसली तरी अणुऊर्जा प्रकल्पाच्या वतीने आम्हाला जमीन हस्तांतरणाबाबत दिलेल्या तातडीच्या सूचनांमुळे लवकरात लवकर हा कार्यक्रम होणार आहे. - खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी, हिंगोली.