आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडगावचे ३०० लष्करी जवान उत्स्फूर्तपणे पाेस्टल मतदानात सहभागी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील आडगावची (पि.) लष्करी जवानांचे गाव ही आेळख. सध्या या गावातील सुमारे ३०० जवान देशाचे संरक्षण करत आहेत. यापैकी सुमारे ९०% जवान प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावतात. सीमेवर पहारा देण्याएवढेच बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीत खारीचा वाटा उचलणेही आमची जबाबदारी आहे. यामुळेच मतदानाची आतुरतेने वाट बघतो आणि न चुकता मतदान करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

मतदारसंघाबाहेरील लष्कर-सुरक्षा दलाचे जवान, देशाबाहेरील अधिकारी-पत्नी, कायद्याच्या नियमाप्रमाणे प्रतिबंधात्मक स्थानबद्ध व्यक्ती, निवडणूक आयोग जाहीर करेल अशा व्यक्ती, तसेच निवडणुकीच्या कामावरील केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांना टपालाने मतदान करण्याची सुविधा आहे. मतमोजणीत सर्वात आधी टपाली मते मोजली जातात.  

दुसऱ्या महायुद्धाचे ढग साचले असताना या गावातील फकीरराव भोसले १९३७ मध्ये लष्करात सामील झाले. युद्धभूमीहून परतल्यावर त्यांच्या शौर्यपूर्ण कथा ऐकून तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला. तिथपासून गावात सुरू झालेली लष्कर भरतीची परंपरा आजवर सुरू आहे. आता प्रत्येक घरातील किमान एक जण लष्करात आहे. केंद्राच्या आदर्श ग्राम सांसद योजनेत या गावाचा समावेशही झालेला आहे. 

जैसलमेर येथे नियुक्त सतीश भोसले म्हणाले, ‘लाेकसभेत पहिल्यांदाच आमच्या रेजिमेंटच्या रेकॉर्ड आॅफिसच्या वैयक्तिक लॉगिनवर मतपत्रिका आली होती. ती डाऊनलोड करून त्यावर सही आणि उमेदवाराच्या नावावर टिक करून ती रेजिमेंंटला जमा केली. तेथून ती संबंधित मतदारसंघाच्या अधिकाऱ्याकडे पोहोचली. विधानसभेच्या मतपत्रिका मात्र टपालाने येतात. त्या आल्यावर लगेच आम्हाला निरोप येतो. आम्ही उमेदवाराच्या नावासमोर खूण करून ती जमा करतो. डिस्पॅचरकडून ती संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवली जाते. आमच्या एवढीच ती रेजिमेंटचीही जबाबदारी असल्याने ते आग्रही असतात. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आॅनलाइन मतपत्रिका पाठवली तर हा टक्का आणखी वाढेल.’
 

चांगल्या समाजासाठी मतदान करा
११ वर्षांच्या  सेवेत २ लोकसभा व २ विधानसभा निवडणुका आल्या. दरवेळी मी मतदान केले आहे. चांगला समाज, सुसंस्कृत राज्य आणि सुढृढ देशाच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी मतदान केले पाहिजे. आळस टाळून, सुटीचा मोह सोडून प्रत्येकाने सोमवारी मतदानाचा हक्क बजावावा.
- सतीश भोसले, लष्करी जवान, जैसलमेर, राजस्थान.
 

आम्ही शंभर टक्के मतदान करतो....
टपाली मतदानाची प्रक्रिया किचकट असली तरी गावातील जवान १०० % मतदान करतात. यादीतून वगळलेल्य जवानांचे नाव पुन्हा सामील करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. ही प्रक्रिया सुटसुटीत झाली तर टपाली मतदान नक्कीच वाढेल.
- अॅड. प्रभाकर साहेबराव भोसले, ग्रामस्थ, आडगाव.