आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीशक्तीची श्रद्धा: परळीत पाऊस पडावा म्हणून ३०० महिलांनी डाेक्यावर कलश घेत काढली मिरवणूक, वैद्यनाथाला जलाभिषेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी  - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या वैद्यनाथाचे स्पर्शदर्शन घेण्याची परंपरा आहे. वैद्यनाथ देवल कमिटीने आपल्या हट्टापायी वैद्यनाथाच्या पिंडीवर चांदीचे आवरण बसवून त्यास अलंकाराचे नाव दिले आहे. हे आवरण बसवल्यापासून परळी व परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याची भावना भाविकांमध्ये आहे. बुधवारी (दि. १०) शहरातील  ३०० महिलांनी डोक्यावर कलश घेत मिरवणूक काढून वैद्यनाथाचा जलाभिषेक केला. परंतु पिंडीवर चांदीचे आवरण असल्याने हा अभिषेक फलदायी होत नसल्याची भावना झाल्याने महिलांनी चांदीचे आवरण काढावे म्हणून मंदिरातच दोन तास ठिय्या आंदोलन केले. देवल कमिटी पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांनी मंदिरात येऊन निवेदन स्वीकारल्यानंतर महिलांनी आंदाेलन मागे घेतले. चार दिवसांमध्ये आवरण काढले नाही तर तीव्र आंदाेलनाचा इशाराही महिलांनी या वेळी दिला. 


परळी शहरातील तीनशे महिलांनी पाऊस पडावा यासाठी डोक्यावर कलश घेऊन मोंढा मैदान हनुमान मंदिर येथून दुपारी एकच्या सुमारास भजन, कीर्तन करत मिरवणूक काढली. वैद्यनाथ मंदिरात त्यांनी जलाभिषेक केला, परंतु चांदीचे आवरण असल्याने जलाभिषेकाची फलश्रुती मिळणार नसल्याची भावना झाली. या वेळी त्यांनी देवल कमिटीच्या कार्यालयात संपर्क साधून चांदीचे आवरण काढण्याच्या सूचना केल्या. परंतु तिथे कुणीच विश्वस्त नसल्याने या महिलांनी मागण्यांचे निवेदन तयार केले. पदसिद्ध अध्यक्ष असलेले तहसीलदार यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत महिलांचे हे निवेदन स्वीकारले. देवल कमिटीकडे पौराणिक काळापासून वैद्यनाथाच्या पिंडीची किती झीज झाली याची नोंद आहे का ? पुरोहित व पौराणिक परंपरेप्रमाणे स्पर्शदर्शन घेण्यासाठी चांदीचे आवरण काढावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर नगरसेविका उमा समशेट्टे, निकिता गाडवे, लता गाडवे, मीना गिराम, सविता उपळे, विजया मालपाणी, सुशीला राजभाये, हिरण देशमुख, सुनीता धुळे, ज्योती जाधव, पद्मा मालपाणी, सुनंदा पवार, ऊर्मिला पवार, वैजयंती इंगळे, रंजना अलविदे, शारदा महाजन, माया ओपळे, सुवर्णा ओपळे, जयश्री घनचकर, अंजू ओपळे, वैशाली रोडे, सुनंदा पंचाक्षरी, वनमाला गौरशेट्टे, सविता देवशेटकर, सुवर्णा मिसाळ, मंगल लिंगाडे, अनिता धुमाळ, रेखा जोशी, रोहिणी कुलकर्णी, सरोजिनी सालमोटे, स्वाती ताटे, श्रद्धा हालगे, मंजूषा चौलवार, महानंदा वडुळकर, सुनीता सातपुते, गंगा सीघे, अरुणा भंडारे, विजया दहिवाळ, छाया बुरांडे, भारती दहिवाळ, रमा आलदे, शोभा तरवडगे, वंदना मिसाळ, शारदा तिळकरी, चंद्रकला वाघमारे, महानंदा शेटे, प्रभावती लव्हराळे, अलका महाजन, उज्ज्वला काटकर, राजश्री भिंगारे, शोभा बेलोरे, भाग्यश्री हालगे, माधुरी जोशी, मंगल जोशी, ज्योती नागापूरकर, विमल हरंगुळे, सुनंदा कोरे, लता खंडे, आशा हरंगुळे, प्रेमला वेरुळे, अनिता पत्रावळे, रंजनी नागापुरे, सुनीता नागापुरे, महादेवी घनचकर, भागीरथी कलशेट्टी, अंजली पोरे, पदमा लंटगे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

जलाभिषेकाची आहे परंपरा : या वर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी परळी व परिसरात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. तसेच परळीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परळी व परिसरात पाऊस पडावा यासाठी या भागातील अनेक नागरिक  वैद्यनाथास जलाभिषेक करत असतात, तर असंख्य भाविक गोदावरी पात्रातील पाणी वैद्यनाथास आणून नित्यनियमाने सेवा करतात.

 

आवरणासाठी देवल कमिटीचा आग्रह असल्याचा आराेप
काही वर्षांपासून परळी व परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले. वैद्यनाथ देवल कमिटीने दहा वर्षांपूर्वी पिंडीवर चांदीचे आवरण टाकल्याने पाऊस पडत नसल्याची भावना भाविकांत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त परळीच्या ज्योतिर्लिंगाचेच स्पर्शदर्शन घेण्याची पौराणिक परंपरा आहे. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी हट्टापायी वैद्यनाथाच्या पिंडीवर चांदीचे आवरण बसवले आहे, असा आराेप महिलांनी केला. 


कमिटीचे सचिव कार्यक्रमात व्यग्र
पाऊस पडावा यासाठी वैद्यनाथाला जलाभिषेक करण्यासाठी आलेल्या शेकडो महिलांनी पिंडीवरील चांदीचे आवरण काढावे यासाठी ठिय्या आंदोलन केले. या महिला निवेदन देण्यासाठी कमिटी कार्यालयात गेल्या असता तेथे कुणीच हजर नव्हते. पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांनी प्रतिनिधी पाठवून महिला भाविकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर दोन तासांनंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...