आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात निवडणुका ते सत्तासंघर्षाच्या काळात ३०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; सरकारच नसल्याने फक्त ५३ प्रकरणे मदतीसाठी पात्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेश जोशी / एसआयटी 

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यापासून सत्तास्थापनेचा पेच निर्माण होईपर्यंत राज्यात तब्बल ३०६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असतानाच राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतीची आशाही मावळली आहे. यामुळे ३०६ पैकी अवघे ५६ प्रकरणे मदतीस पात्र ठरली आहेत. उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे भीषण वास्तव समोर आले अाहे. तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा तर निसर्गाने शेतकऱ्यांची परीक्षाच बघितली. आधी पावसाने उशीर केला. यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. नंतर परतीच्या पावसाने घात केला. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस मातीमोल झाल्याने शेतकरी हादरले. भविष्यातील सर्व आशा मावळल्या. यामुळे वर्षभर उपजीविका कशी चालवायची, या विवंचनेत असलेल्या ३०६ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. रणधुमाळीत नेत्यांचे दुर्लक्ष 

राज्यात २१ आॅक्टोबरला एकाच टप्प्यात विधानसभेचे मतदान होते. यासाठी २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. २४ ऑक्टाेबर रोजी निकाल लागले. मात्र निकालाच्या दिवसापासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच तब्बल २४ दिवसांनंतरही कायम आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते आधी निवडणुकीच्या प्रचारात आणि नंतर सत्तास्थापनेत व्यग्र असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच होते.१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१९ 

महाराष्ट्रात यंदा सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली होती. तेव्हापासून सत्तास्थापनेपर्यंत म्हणजेच १ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ३०६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे राज्य शासनाच्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले. ३०६ पैकी फक्त ५३ प्रकरणे पात्र ठरली. राष्ट्रपती राजवटीमुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतीची आशाही मावळली आहे. विभाग    आत्महत्या    पात्र    अपात्र
विदर्भ    १६५    ०६    १५९


मराठवाडा    १४१    ४७    ९४
 
एकूण    ३०६    ५३    २५३१ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१९

> मराठवाडा : या काळात ७४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैकी ५३९ मदतीस पात्र, १३७ अपात्र ठरले. ७० प्रकरणे चौकशीस प्रलंबित आहेत.

> विदर्भ :  या काळात ९०८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पैकी ३३६ पात्र, २७५ अपात्र तर २९७ चौकशीसाठी प्रलंबित आहेत.