आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

329 ऑनलाइन अर्ज, आता उरले शेवटचे तीन दिवस...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदवणारेे व ऑफलाइन अर्ज नेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ३२९ जणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमनेही अर्ज दाखल केला आहे. सुटी वगळता अवघे तीन दिवस उरले असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. 

 

२० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना गती आली आहे. युती, आघाडीचा घोळ अजूनही कायम असल्याने अनेकजण संभ्रमात आहेत. दमदार उमेदवार रिंगणात उतरवून विजय मिळवण्यासाठी सर्वेक्षण, तसेच चाचपणी पूर्ण झाल्या आहेत. शिवसेनेने आतापर्यंत ३२ जणांची यादी प्रसिद्ध केली असून तिसरी यादी प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे भाजपनेही १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी व काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. मातब्बर उमेदवारांची तिकिटे निश्चित मानली जात आहेत. निवडणूक प्रक्रियेत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

 
आतापर्यंत सुमारे ३२९ इच्छुकांनी ऑनलाइन नोंद केली असून २९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरसेविका दीपाली बारस्कर, रवि वाकळे, सारिका हनुमंत भुतकर यांच्यासह वैशाली बनसोडे, कुमार वाकळे आदींनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांच्या उर्वरित याद्या पक्षांनी गुलदस्त्यात ठेवल्या असल्या, तरी आपल्यालाच उमेदवारी असा दावा करत अनेकांनी अर्ज दाखल केले. निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. २० पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. शनिवारी व सोमवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. २२ ला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होईल. अर्ज बाद होऊ नये, यासाठी अनेकांनी दोन ते तीन ऑफलाइन अर्ज घेतले आहेत. अर्जांची धामधूम जोरात सुरू असताना युती व आघाडीची सहमती एक्सप्रेस धावणार का? युती व आघाडी झाली तर कोणाचा पत्ता कट होऊ शकतो, या चर्चेला उधाण आले आहे. 


भारिप देणार ६८ उमेदवार 
एमआयएमसह समविचारी पक्षांना एकत्र घेऊन भारिप महासंघ मनपा निवडणुकीत उतरणार आहे. त्यात ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार महासंघ आदी पक्षांनाही बरोबर घेतले जाणार आहे. चारित्र्यवान इच्छुकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भारिपचे पदाधिकारी अशोक सोनवणे यांनी सांगितले. उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 


रणधुमाळी जोरात 
प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणनिती आखली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांचे प्रत्येकी दोन ते तीन गट घरोघरी भेटी देत आहेत. विशेष म्हणजे भाजपचा डिजिटल प्रचार जोरात सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांनी प्रचाराचे रथही तयार केले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येकजण आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 


उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार 
दीपाली बारस्कर (शिवसेना प्रभाग १), सारिका भुतकर (तीन अर्ज, शिवसेना, भाजप, अपक्ष, प्रभाग ६), रवींद्र वाकळे (शिवसेना, प्रभाग ६ ब,ड), वैशाली बनसोडे (राष्ट्रवादी, प्रभाग ७ अ), पोपट बारस्कर (७ ब), स्वाती कातोरे (७ क), कुमार वाकळे (राष्ट्रवादी, ७ड), शिला चव्हाण (कॉंग्रेस, ९ अ ), श्रीपाद छिंदम (अपक्ष, ९ क), दीप चव्हाण (कॉंग्रेस, १० अ), कल्पना भंडारी (कॉंग्रेस, ११ क), शिवाजी काळभोर (अपक्ष,११ ड), शैलेश मुनोत (भाजप, १२ ड), उमेश (गणेश) कवडे (शिवसेना, १३ अ), संगीता बिज्जा (शिवसेना, १३ ब), सोनाली चितळे (भाजप), सुभाष लोंढे (शिवसेना, १३ ड), भगवान फुलसौंदर (शिवसेना, १४ अ), सुरेखा भोसले (शिवसेना, १४ ब), गणेश भोसले (राष्ट्रवादी,१४ ड), संगीता भोसले (राष्ट्रवादी), विजय गव्हाळे (अपक्ष), सुवर्णा जाधव (शिवसेना, १५ ब),विद्या खैरे (शिवसेना, १५ क), प्रितेश गुगळे (भाजप, १५ ड), दत्तात्रय खैरे (अपक्ष), सुमन गायकवाड (अपक्ष, १६ अ), मोहिनी लोंढे (शिवसेना,१७ ब). 

बातम्या आणखी आहेत...