आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्याचे आरोग्यच 'आयसीयू'त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जनसामान्यांसाठी उपचार म्हणजे गंभीर आर्थिक समस्या ठरली आहे. त्यातही दुर्धर आजार, अपघात झाल्यास घरात असलेले किडूक-मिडूक विकण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येते. त्यामुळे सामान्य माणसांची आस ही शासकीय आरोग्य व्यवस्थेवरच अवलंबून आहे. परंतु, ग्रामीण भागात शासकीय आरोग्य व्यवस्था चालवणारे डाॅक्टर्सच नसल्यामुळे उपचारासाठी नेमके कुणाकडे पहावे , असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात डाॅक्टर व आरोग्य सेविकांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य व्यवस्थाच 'आयसीयू'मध्ये असल्याने जनसामान्यांवर उपचार होणार कसे? असा प्रश्न िनर्माण झाला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना जीव वाचविण्यासाठी तालुका व शहरातील खासगी डाॅक्टरांकडे उपचार घेऊन, प्रचंड पदरमोड करावी लागत आहे. 

 

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डाॅक्टरांची ३३, आरोग्य सेविकांची २०८ आणि आरोग्य सेवकांची ५२ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची चांगलीच तारांबळ उडाली असून याचा मोठ्या प्रमाणात फटका ग्रामीण तसेच मेळघाटसारख्या आदिवासी भागातील रुग्णांना बसत आहे. 


ग्रामीण व मेळघाटसारख्या आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डाॅक्टरांच्या अनुपस्थितीमुळे जीवघेण्या संकटांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सेवक आणि सेविकांचीही पदे शासनाद्वारे नोव्हें. २०१५ पासून भरण्यातच आली नाहीत. तसेच जिल्हा परिषदेद्वारेही भरती बंद आहे. ही पदे राज्य स्तरावरून भरली जातात. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना अद्याप पदे भरण्यात आली नाहीत, म्हणजे शासन आमच्या मरणाची तर वाट बघत नाही ना, अशा प्रतिक्रिया ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांकडून व्यक्त होत आहेत. 


बीएएमएस डाॅक्टरावंरच आहे मदार 

जिल्ह्यातील ५९ पैकी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डाॅक्टर नसल्यामुळे या ठिकाणी बीएएमएस डाॅक्टरांद्वारे काम भागवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील विशेषत: मेळघाटसारख्या आदिवासी भागातील रुग्णांना वेळप्रसंगी जिवाची जोखीम पत्करून अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात िकंवा खासगी डाॅक्टरांकडे आणावे लागते. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर वेळेवर डाॅक्टरच उपलब्ध नसतात, असे चित्र आहे. 

 

कामाचा ताण वाढलायं 
मोठ्या प्रमाणात डाॅक्टर, आरोग्य सेवक व सेविकांची पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. धावपळ करावी लागते. मानधन तत्त्वावरील लोकांकडून काम करून घ्यावे लागते. डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती. 

 

एमबीबीएस डाॅक्टर येण्यास नसतात तयार, त्यामुळे त्रास 

जिल्ह्यात एमबीबीएस तज्ज्ञ डाॅक्टरांची मागणी असली तरी अजुनही ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषत: मेळघाट तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये येण्यास एमबीबीएस डाॅक्टर्स तयार नाहीत. त्यामुळे या भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. त्यांची गैरसोय होत असते. अशा अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी मागेल त्या सुविधा देत जिल्ह्यात एमबीबीएस डाॅक्टरांच्या नियुक्तीची व्यवस्था केली होती. काही पदेही भरण्यात आली. मात्र आदिवासी व ग्रामीण भागात डाॅक्टर फारवेळ टिकत नाहीत, ही शोकांतिका आहे. आरोग्य केंद्र केवळ बघण्याची वस्तू बनले आहेत. येथे सोयी सुविधांच्या अभाव दिसून येतो. 
 

बातम्या आणखी आहेत...