survey report / ३३% महिला गुंतवणुकीचे स्वत:च निर्णय घेतात, तर ६४% पुरुष गुंतवणुकीचे निर्णय स्वत:च घेतात : ‘डीएसपी इन्व्हेस्टर पल्स’चा सर्व्हे

१३% महिला म्हणाल्या, गुंतवणुकीचा निर्णय पतीच्या मृत्यूमुळे घेतला 

वृत्तसंस्था

Jun 01,2019 10:37:00 AM IST

नवी दिल्ली - देशात पुरुषांच्या तुलनेमध्ये अर्ध्या महिलादेखील गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्र घेत नाहीत. उद्योगांमध्ये कार्यरत लोकांमध्ये महिलांची मोठी भागीदारी असतानाही अशी स्थिती दिसून येते. एका अभ्यास अहवालात ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार केवळ ३३ टक्के महिलाच गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्र घेतात. तर गुंतवणुकीचे स्वतंत्र निर्णय घेण्यात पुरुषांची संख्या ६४ टक्के आहे. ‘डीएसपी इन्व्हेस्टर पल्स-२०१९’ च्या सर्व्हेत ही माहिती समोर आली अाहे. हा सर्व्हे संशोधन संस्था निल्सनसोबत मिळून करण्यात आला होता. डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा.लि. चे अध्यक्ष कल्पेन पारेख यांनी सांगितले की, महिला वर्गाकडे गुंतवणूक उद्योगाने आतापर्यंत दुर्लक्षच केले आहे. सर्व्हेनुसार ज्या महिला गुंतवणुकीचा निर्णय स्वत: घेतात त्यामध्ये त्यांचे पती किंवा आई-वडिलांचे महत्त्वाचे योगदान असते. सुमारे १३ टक्के महिलांनी सांगितले की, पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर त्यांना स्वत:ला निर्णय घ्यावे लागले. ३० टक्के महिलांनी सांगितले की, स्वत: गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही बचत करू शकलो. मुलांचे शिक्षण, घराची खरेदी, मुलांचे लग्न, कर्जमुक्त जीवन आणि उच्च जीवनमान हे जवळपास महिला आणि पुरुषांमध्येही गुंतवणुकीचे समान उद्दिष्ट आहे.

सोने खरेदीत महिलांची भूमिका महत्त्वाची

कार किंवा घर खरेदी करण्याच्या निर्णयात पुरुषांची महत्त्वाची भूमिका असते, तर सोने/दागिने, दररोजच्या वापरातील वस्तू उदा : टीव्ही-फ्रिजसारख्या टिकाऊ वस्तू खरेदी करताना महिलांची भूमिका जास्त महत्त्वाची असते.

गुंतवणुकीचा १००% निर्णय असल्याचे १२% म्हणाल्या

केवळ १२% महिलांनी सांगितले की, शेअर, इक्विटी, म्युच्युअल फंड यासारख्या बाजारआधारित इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणुकीचा १००% निर्णय त्यांचा होता. तर असे करणाऱ्या पुरुषांची संख्या ३१% होती.

२५ तेे ६० वयात महिला-पुरुष करतात जास्त गुंतवणूक

या सर्व्हेमध्ये देशातील आठ शहरांत ४,०१३ महिला आणि पुरुषांची मते घेण्यात आली. हा सर्व्हे त्यांच्या जीवनातील उद्दिष्ट आणि पैशासंदर्भात त्यांना असलेली जाण याची माहिती जमा करण्याच्या उद्दिष्टाने करण्यात आला होता. गुंतवणुकीचे निर्णय घेणाऱ्या २,१६० महिला आणि १,८५३ पुरुषांचे वय २५ ते ६० वर्षांदरम्यान असल्याचे या सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

जगाची स्थितीही जास्त चांगली नाही, ४२% महिला स्वत: घेतात निर्णय, ५८% पतीच्या भरवशावर सोडतात

जागतिक स्थितीही यापेक्षा खूप वेगळी नाही. ४२ टक्के महिला गुंतवणुकीचे निर्णय स्वत: घेतात. २० ते ३४ वयाच्या ४४ टक्के महिलांनी आणि ५१ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४६ टक्के महिलांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वत: घेत असल्याचे सांगितले. यूबीएस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंटने हा सर्व्हे केला होता. महिला-पुरुष दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा निर्णय घेतात, त्या वेळी स्थिती चांगली राहत असल्याचे यात समोर आले आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास जास्त असतो आणि तणाव कमी होतो. महिला आणि पुरुषांनी एकत्रित गुंतवणुकीची योजना तयार करावी हेच जास्त योग्य ठरते.

५-१० मिनिटांत गुंतवणुकीचा निर्णय : यूबीएस ग्लोबल
1. गुंतवणुकीबाबत महिला-पुरुषांनी जास्त वेळ चर्चा करू नये. ५-१० मिनिटांचे नियोजन योग्य आहे.
2. दोघांनी एकमेकांचे विचार समजून घ्यावे. दोघांपैकी कुणी एक चुकीचा तर नाही ना, याकडे लक्ष द्या.
3. स्वत:चे सर्व निर्णय बरोबर आहेत, हे समजावून सांगण्याऐवजी दुसऱ्याचे विचार ऐकावे. काही एकमेकांवर सोडा.
4. समोरच्याचे उत्तर ठीक आहे, असे एका वाक्यात मिळाले तरी सर्व माहिती दुसऱ्याला द्यायला हवी.

X
COMMENT