आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत 33% घट; पुरुषांचे प्रमाण फक्त 1 टक्का 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागामार्फत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या सहा वर्षांत नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. २०१३- १४ मध्ये १०६२७ स्त्रियांनी आणि ८९ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली होती, त्यात २०१८ नोव्हेेंबरपर्यंत ७३८५ स्त्रिया, तर १६ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे. पुरुष नसबंदीचे वर्षभराचे प्रमाण एक टक्काच आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकूणच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी १७ हजार ३९६ इतकी असलेली संख्या यावर्षी ७४०१ वर आली आहे. याविषयी आरोग्य विभागाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. 


एकीकडे स्त्रियांपेक्षा सोपी शस्त्रक्रिया असूनही पुरुष शस्त्रक्रिया करत नाहीत. महिलेलाच यासाठी पुढे यावे लागते. असे असताना विभागाकडून यासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांमध्येही भेदभाव केला जातो. स्त्रियांना ६०० रुपये मिळतात, तर पुरुषाने नसबंदी केल्यास आरोग्य विभागाकडून ११०० रुपये दिले जातात. स्त्री व पुरुष नसबंदीमधील हा भेदभाव खटकणारा असून त्यात बदल करण्याची गरज आहे. 

 

याशिवाय कुटुंब नियोजनासाठी गर्भनिरोधक गोळ्या व कंडोमचे वाटप केले जाते. आरोग्य विभागाच्या अहवालातच गेल्या काही वर्षांत गर्भनिरोधक गोळ्यांचा व कंडोमचा वापर कमी होत गेल्याचे दिसून आले. दहा हजार गर्भनिरोधक गोळ्यांच्या वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले गेले असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी ३ हजार गोळ्यांचेच वाटप करण्यात आरोग्य विभागाला यश आले. 

 

एकूण शस्त्रक्रियांमध्येच घट, विभागाचे अपयश 
वास्तविक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत स्त्री व पुरुष दोघांचा समावेश असावा, असे सरकारचे धोरण आहे. वरील आकडेवारी पाहता कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत पुरुषांचे प्रमाण कमी तर आहेच त्यातही एकूण शस्त्रक्रियांमध्येच घट झाली आहे. याला आरोग्य विभागाचे अपयश म्हणता येईल. 

 

असे आहेत समज-गैरसमज 
पुुरुष नसबंदीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. पुरुषांना असे वाटते की, यामुळे आपले पौरुषत्व जाईल. आयुष्यात कधीच मुलंबाळ होणार नाहीत. पुरुष घरात कर्ता असतो. शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल. शिवाय महिलांमध्येही शस्त्रक्रियेनंतर वजन वाढण्याची भीती असते. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते यामध्ये काहीही तथ्य नाही. 

 

पुरुषांसाठी अवघ्या पंधरा मिनिटांची शस्त्रक्रिया 
खर ंतर, पुरुष नसबंदीसाठी नो स्काल्पेल (ब्लेडच्या वापराशिवाय) सर्जरीही केली जाते. अवघ्या पंधरा मिनिटांत ही शस्त्रक्रिया होते व दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करणारी व्यक्ती कामावर जाऊ शकते. सामान्यपणे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण भूल द्यावी लागत नाही. या शस्त्रक्रियेनंतर पुरुषत्व नाहीसे होत नाही. कोणतेही काम केल्यास त्रास होत नाही. 

 

नेमकी केव्हा करता येते स्त्रियांवर शस्त्रक्रिया 
स्रियांवर बाळंतपणानंतर, पाळीनंतर, सिझेरियन किंवा अॅबॉर्शनबरोबर, पोटाकडून दुर्बिणीतून किंवा योनिमार्गातून करता येते. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्यास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन, पाठीत इंजेक्शन देऊन किंवा जागीच इंजेक्शन देऊन करता येते. 

 

थेट सवाल 
1. कुटुुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत इतका फरक का पडला ? 
- याचे ठोस कारण सांगता येणार नाही. बरीच कारणे आहेत. दुसऱ्या साधनांचा वापर वाढला आहे. 

2. माहिती देणाऱ्या व जागरूकता करणाऱ्या जाहिराती कमी झाल्या का ? 
- तशी काहीही अडचण नाही. वेळोवेळी जाहिराती या केल्याच जातात. मध्यंतरी सुरू झालेल्या एमआर अभियानामुळेही फरक पडला असावा. 

3. मग याबाबतचे सरकारचे बजेट कमी झाले का ? 
- बजेटचा प्रश्नच नाही, पैसा भरपूर आहे. 

4. तर मग कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली का ? 
- आमच्याकडे एनएमची १८० पदे रिक्त आहेत. तीन-चार वर्षे झाली. लवकरच ही भरती होणार असल्याचे फक्त सांगितले जाते.
 
5. कर्मचारी कमी असूनही यावर्षी पेक्षा गेल्या वर्षी शस्त्रक्रियांचा आकडा जास्त होता. या वर्षी तो कमी का झाला ? आरोग्य विभागाची कार्यक्षमता कमी झाली का ? 
- वरील अन्य प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शेवटच्या दोन प्रश्नांची उत्तरे मात्र टाळली. कामात असल्याचे कारण पुढे करत याबाबत बोलणे त्यांनी टाळले. आम्ही नंतर त्यांना मोबाइलवर मेसेज पाठवून दोन दिवस वाट पाहिली. मात्र, उत्तर मिळाले नाही. 
- डॉ. अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी 


अशी आहे गेल्या सहा वर्षांची आकडेवारी 
वर्ष टार्गेट पुरुष स्त्रिया एकूण 
२०१३-१४ १२७५० ८९ १०६२७ १०७१६ 
२०१४-१५ १२३८६ १०२ ८१८२ ८२८४ 
२०१५-१६ १२८६४ ८३ १०५२० १०६०३ 
२०१६-१७ १२५९१ ४७ ९०१५ ९०६२ 
२०१७-१८ १८९११ ५० १७३४६ १७३९६ 
२०१८-१९ १२५९१ १६ ७३८५ ७४०१ 

 

काय म्हणतात तज्ज्ञ 
पुरुषांत आहेत गैरसमज 

पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांनाच ऐकावे लागते. शिवाय पुरुषांमध्ये या शस्त्रक्रियेबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यांना पौरुषत्व जाईल, असे वाटते. यावर कौन्सिलिंग करणे जास्त महत्त्वाचे आहे. डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय 

 

पुरुषांना केंद्रबिंदू करा 
पुरुषप्रधान संस्कृतीही याला कारणीभूत आहे. याबाबत गावपातळीबरोबरच शहरातही जनजागृती करणे गरजेचे आहे. सरकारने आजपर्यंत कुटुंब नियोजन उपक्रमात महिलांना केंद्रबिंदू ठेवून विविध योजना चालवल्या. पण आता पुरुषांनाही केंद्रबिंदू ठेवून पाऊल उचलले पाहिजे. -भारत खैरनार, सामाजिक शास्राचे प्राध्यापक 


 

ना 'नियोजन' ना नियंत्रण भाग २ : ५ वर्षांत ४८ शस्त्रक्रिया फेल, ३ वर्षांत ४ महिलांचा मृत्यू


ना 'नियोजन' ना नियंत्रण अंतिम भाग : सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेत ११ वर्षांत फक्त २८ लाभार्थी 
 

बातम्या आणखी आहेत...