आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलायझाच्या तपासणीद्वारे जिल्ह्यात आढळले डेेंग्यूचे ३४ रुग्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बुलडाणा- जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची साधार भीती आता इलायझाच्या तपासणीतून निश्चित झाली असून, ३० नोव्हेंबर पर्यंत सेंटीनल सेंटर येथे १६२ रक्त जल नमुन्यांची केलेल्या विश्वसनीय इलायझा चाचणीमध्ये ३४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, रॅपीड टेस्टद्वारे खासगी रूग्णालय,प्रयोगशाळा येथे तपासलेल्या रक्त जल नमुन्यांमध्ये २७२ डेंग्यू आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या आजाराबाबत विधिमंडळ अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 
बुलडाणा शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वार्डनिहाय जास्तीत जास्त गृह भेटी देण्यात आल्या होत्या. यावर दिव्य मराठीने प्रकाश टाकला होता. विदर्भ हाउसिंग कॉलनी नंतर रामनगरातही डेंग्यू आजार पसरवणाऱ्या डासाच्या अळया आढळून आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली होती. पालिकेचे काम मात्र उदासीनतेचेच होते. काँग्रेसने आरोप प्रत्यारोप केल्यानंतरही पालिका प्रशासन व पदाधिकारी काही दाद देत नव्हते. अखेर या प्रश्नावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. दरम्यान जलद ताप सर्वेक्षण करणे, डास अळ्या आढळून आलेल्या पाणी साठ्यामध्ये टेमीफॉस टाकणे, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे आदी कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे पाणी साठे उघडे असता कामा नये, याबाबत बांधकाम धारकास नोटीस बजावण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालय येथे डेंग्यू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 


बुलडाणा शहरातील चैतन्यवाडी परिसरात नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, नगरसेवक तसेच न.प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घरोघरी पाहणी करून डास अळ्या आढळलेले पाणी साठे व विहिरीत गप्पीमासे सोडण्यात आले. नगर पालिकेमार्फत मायकिंगद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.डेंग्यू वर प्रतिबंध करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येत आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी यांचे म्हणणे आहे. 


माहिती देण्याचे खासगी तपासणी केंद्रांना आवाहन 
डेंग्यूच्या संशयित रुग्णांचे रक्त जल नमुने तपासणीकरिता सेंटीनल सेंटर, अकोला येथे पाठवणे, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने धूर फवारणी, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येत आहे. भारत सरकारने डेंग्यू नोटीफायबल डिसीज घोषित केल्यामुळे शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक,प्रयोगशाळा यांच्याकडे रॅपीड डायग्नोसिस टेस्ट किटद्वारे डेंग्यूच्या संशयित रुग्णांचे नाव, पत्ता व चाचणी पेपर जिल्हा हिवताप कार्यालयास पाठवण्याबाबत संबंधितांना पत्र दिले आहे. 


डेंग्यूसाठी लस नाही,मात्र हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय 
डेंग्यू वर निश्चित असा औषधोपचार अथवा लस नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच एकमेव मार्ग आहे. परिसर स्वच्छ ठेवा, परिसरातील केरकचरा एकत्रित करून जाळून नष्ट करा, डबकी असल्यास ती त्वरित बुजवावी, शक्य नसल्यास त्यावर तेल,वंगण टाकावे किंवा गप्पीमासे साेडावेत. घरात, गच्चीवर अडगळीच्या वस्तू नष्ट कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून यादिवशी घरातील पाणी साठे स्वच्छ करावी, त्यांना उन्हात वाळवून मगच त्यात पाणी भरावे व कापडाने झाकून ठेवावे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा, व्हेंट पाइपला जाळी बसवा, खिडक्यांना डास रोधक जाळी बसवावी. 
 

बातम्या आणखी आहेत...