आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मन भाषा येत नसल्याने ३४ टक्के विदेशींना पती किंवा पत्नीपासून दूर राहावे लागतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीत जर्मन भाषेच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे सुमारे ३४ टक्के परदेशी पत्नी वा पतीस जोडीदारासोबत राहता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा लोकांना सरकार व्हिसा नाकारते. परदेशी जोडीदाराला डॉइच-१ ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या परीक्षेत जर्मन भाषेतील मूलभूत माहिती विचारली जाते. 


ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र सरकारकडे जमा करावे लागते. त्यानंतरच व्हिसाची प्रक्रिया पुढे सुरू राहते. हा नियम युरोपीय देशांतून येणाऱ्या लोकांसाठी मात्र लागू नाही. त्याशिवाय अमेरिकी व इस्रायलच्या लोकांनाही सवलत देण्यात आली आहे. 


काही मान्यता दिलेले स्थलांतरितही या नियमाला अपवाद ठरतात. सरकारने डॉइच-१ च्या २०१८ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानुसार ४८ हजार १३० लोकांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार २०० लोक नापास झाले होते. नापास झालेल्यांमध्ये तुर्की, रशिया, मॅसेडोनिया, कोसोवो, थायलंड, व्हिएतनाम व इराकमधून आलेले नागरिक होते. नापास होणाऱ्यांत सर्वाधिक इराकचे ५० टक्के लोक आहेत. स्थलांतरित विभागाच्या मते, जर्मन भाषेतील साधे वाक्य समजू शकणारी व जर्मनीत आपल्या परिचय देऊ शकते, अशीच व्यक्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकते. साधी का होईना जर्मन भाषा यायला हवी. बाजारात गेल्यानंतर सहजपणे खरेदी करता यायला हवी. एखाद्याने पत्ता विचारल्यास त्यास जर्मनीतून सांगता यायला हवे. 


अशा व्यक्तीला जर्मनमधून अर्जदेखील भरता यायला हवा. जर्मन सरकारचे अधिकारी अनेटे विडमन-माउत्स म्हणाले, परदेशी लोकांना आधीपासूनच जर्मनचे सामान्य ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे जर्मनीत येताच ते जर्मन लोकांमध्ये मिसळू शकतील. त्याचबरोबर समाजात आपले स्थानही बनवू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...