आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१८ मध्ये दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी, लगेच २०१९ मध्ये त्याच रस्त्याच्या पॅचवर्कसाठी पावणेचार कोटी मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोळेगाव ते धोत्रा चार किमीचे काम मंजूर तरी निविदा नाही; खड्डे बुजवण्याचे बिल काढले, नंतर निविदा

अमोल चितळे 

शिवना- गोळेगाव ते शिवना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम व लगेच नवीन रस्ता बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन एका वर्षात दोन वेळा काम करून शासनाला सात कोटी रुपयांचा चुना लावण्याचा कार्यक्रम ठेकेदार, अधिकाऱ्यांनी संगनमताने हाती घेतला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ता उखडलेलाच असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर खड्डेमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत गोळेगाव ते शिवना रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी ३ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ ला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. 

रस्ता दुरुस्तीनंतर पाच वर्षांत पुन्हा खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदाराने चार वेळा म्हणजे दीड वर्षाला एकदा रस्ता दुरुस्त केला पाहिजे असा नियम आहे. त्या ठराविक कालावधीनंतर ठेकेदारास रक्कम देण्याची तजवीज होती. वर्षभरापूर्वी तयार केलेला गोळेगाव ते शिवना वीस किमी रस्त्याची चार वेळा दुरुस्ती केल्याचे दाखवून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पूर्ण रक्कम उचलून घेतली. विशेष म्हणजे दुरुस्त केलेला रस्ता सहा महिनेही टिकला नाही. लगोलग हा रस्ता नव्याने तयार करण्यासाठी पुन्हा ३ कोटी ८५ लाख मंजूर करून घेण्यात आले असून कामही सुरू करण्यात आले आहे. म्हणजे वर्षभरात सात कोटी रुपये या रस्त्यावर खर्च होणार आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाचे सिल्लोडचे उपअभियंता बी. के. मराठे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे काम मंजूर असल्याचे सांगितले.       

प्रथमदर्शनीच हे काम निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा खड्डेमुक्तीसाठी कोट्यवधी, तर आता नवीन कामासाठी तीन कोटींवर खर्च या कामात होणार असल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतापावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोळेगाव-धोत्रा-शिवना ते वडाळीपर्यंत ३ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर असताना, गोळेगावच्या पुढे चार किमी अंतरावरून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर, मागे गोळेगाव येथून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. यासाठी जाणीवपूर्वक गोळेगाव ते धोत्रा चार किमीचे काम मंजूर असूनही त्याची निविदा काढण्यात आली नाही. खड्डे बुजविणचे बिल निघाल्यानंतर निविदा काढण्याचा घाट घातला गेला असल्याची सूत्रांची माहिती आहे. याचवेळी याच रस्त्याच्या पुढील किलोमीटर पासून शिवना गावापर्यंतच्या कामाची निविदा काढून कामही सुरू करण्यात आले आहे. असाच प्रकार हाच सलग रस्ता असलेल्या शिवना ते वडाळी गावापर्यंतच्या कामाचा असून त्याचीही निविदा काढण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...