आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाचा मुक्काम मंगळवारीही शहरात कायम राहिला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यात २४७ मि.मी. तर शहरात १५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात गंगापूर धरणांच्या क्षेत्रात असलेल्या पर्जन्यमापक केंद्रात ५० मीमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणातून सायंकाळी ६ वाजता ३ हजार ६४० क्युसेकने पाणी सोडावे लागले. त्यामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहाेचले होते. त्यामुळे महापालिकेसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गोदाकाठावरील नागरिकांना धोक्याचा इशारा देत गोदाकाठी न जाण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यात जाेरदार पाऊस झाला. त्यातही इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यांसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचे पाणलोट असलेल्या आंबोलीत पर्जन्यकेंद्रात ७३ मि.मी., गौतमीत ४१, त्र्यंबकेश्वरमध्ये २१ आणि कश्यपीत १८ मि.मी. इतक्या पावसाची नाेंद झाली. त्यामुळे गंगापूरमधून ३,६४० क्युसेकने तर कश्यपीतून ६३९ क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळेच गोदावरीलाही पूर आला आहे. दुसरीकडे इगतपुरीत दिवसभरात ६२ मीमी पावसाची नोंद झाल्याने आणि त्यापूर्वीच दारणासह इगतपुरीतील महत्त्वाची धरणे ८५ टक्यांहून अधिक भरलेली आहेत. त्यामुळे दारणातून ७ हजार १७८ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी, दारणा, वालदेवीसह इतर नद्यांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात साठवण केली जात असल्याने या बंधाऱ्यातून मंगळवारी सायंकाळी ७ वाजेला १२ हजार ९३ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता.
गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा
सर्वांच्याच नजरा लागून असलेल्या गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के तर धरणात ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. दरम्यान, गंगापूर धरण समूहातील गंगापूर, कश्यपी आणि आळंदी या तीन धरणांतून पाणी सोडले जात आहे. पालखेड समूह ९७ टक्के भरला आहे. त्यातील तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे.
धरणातून विसर्ग सुरूच
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात येऊन तो ३,१२० क्युसेक करण्यात आला. याचप्रमाणे दारणातून ७,१७२ क्युसेक, कश्यपी ४२६ क्युसेक, पालखेड २,९५२ क्युसेक, ठेंगोडा ५,७०० क्युसेक, हरणबारी १,२२२ क्युसेक, पुनद ८४७ क्युसेक, करंजवण ३,१०० क्युसेक, नांदूरमध्यमेश्वर ८,९३८ क्युसेक असा विसर्ग सुरू अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.