आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी संस्थांच्या शाळांमधील २३ शिक्षकांची पदे व्यपगत होण्याच्या मार्गावर, शिक्षणसम्राटांना दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील प्राथमिक १४ तर माध्यमिक शिक्षकांची नऊ पदे व्यपगत होण्याच्या मार्गावर आहेत. याचा फटका जिल्ह्यातील शिक्षणसम्राटांना बसणार आहे. समायोजन प्रक्रियेमध्ये ही पदे दाखवण्यात आली नाहीत. पदे कमी झाल्यामुळे ३८ शिक्षकांना जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची वेळ येणार आहे. दरम्यान शुक्रवारी सात प्राथमिक तर शनिवारी माध्यमिक २० रिक्त जांगांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. 

 

खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे म्हणजे शिक्षण विभागासाठी डोकेदुखी बनली आहे. समायोजित शिक्षकांना संबंधित खासगी शाळा रुजू करून घेत नसल्यामुळे बहुतांश शिक्षकांनी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून हातात खडूच घेतलेला नाही. 


गेल्या वर्षी माध्यमिकचे नऊ तर प्राथमिकच्या १७ शिक्षकांचे समयोजन झाले. मात्र, माध्यमिकच्या एकाही शिक्षकाला रुजू करून घेतले नाही. तसेच प्राथमिक १४ शिक्षकांना रुजू करून घेतले नाही. वर्षभर या शिक्षकांनी संबंधित शाळांचे उंबरठे झिजवले. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. यावेळी पुन्हा त्यांना समायोजनासाठी यावे लागले. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवारी पार पडली. यामध्ये २० शिक्षकांना शाळा मिळाल्या. एका शिक्षकाचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यांना प्रक्रियेत भाग घेता आला नाही. उर्वरित सहा शिक्षकांना मात्र, जिल्ह्याच्या बाहेर मिळेल त्या शाळांमध्ये जावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यात एकूण ३८ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त होते. त्यांना खासगी संस्थांमध्ये केवळ सात जागा उपलब्ध होत्या. त्यांच्यातील सातही जणांना या जागांवर समायोजित करण्यात आले. उर्वरित ३१ जणांना अन्य जिल्ह्यात जावे लागणार आहे. त्यांच्याकडून अन्य जिल्ह्यात जाण्यासाठीचा विकल्प भरून घेण्यात आला आहे. हे समायोजन करत असताना प्राथमिकचे १४ तर माध्यमिकचे नऊ पदे पटलावर दाखवण्यात आली नाहीत. गतवर्षी समायोजित शिक्षकांना येथे रुजू न करून घेतल्यामुळे ही पदे व्यपगत केल्यात जमा आहेत. वास्तविक पहाता पूर्वीच या दृष्टीने संस्थाचालकांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात समाधानकारक खुलासा सादर केला नाही. यामुळे त्यांच्या शाळांमधील पदे व्यपगत होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. माध्यमिक २०, प्राथमिकच्या ७ शिक्षकांचे समायोजन पूर्ण, प्रक्रिया ठरली शिक्षण विभागाची डोकेदुखी 
 

आता तरी रुजू करून घेणार का ? 
आता नवीन निवडण्यात आलेल्या शाळांमध्ये तरी या शिक्षकांना पदस्थापना मिळणार का, हा प्रश्न आहे. पूर्वीच्याच संस्थाचालकांप्रमाणे यांनीही भूमिका घेतली तर पुन्हा या शिक्षकांची गोची होणार आहे. यामुळे नियमांची कडकपणे अंमलबजावणी करून शिक्षकांना रुजू करून घेण्यासाठी शिक्षण विभागानेच पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

 

शिक्षकांची मानसिकता ढासळली 
शासनाचे शैक्षणिक धोरण, संस्थाचालकांची मनमानी, प्रशासनाची उदासिनता यामुळे जिल्ह्यात खासगी शिक्षकांना २०११ पासून अध्यापनाची संधी मिळालेली नाही. यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. आता तर अतिरिक्त शिक्षकांना अन्य जिल्ह्यात पाठवण्यात येत आहे. तेथेही रुजू करून न घेतल्यास शिक्षकांमध्ये नकरात्मक भावना वाढीस जाऊन अध्यापनावर परिणाम होऊ शकतो. 

 

संस्थाचालकांचा कावेबाजपणा 
अनेक संस्थाचालकांनी न्यायालयीन प्रकरणाचे कारण सांगत शिक्षकांना रुजू करून घेतलेले नाही. यामुळे त्यांची पदे व्यपगत होत आहेत. आता अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्याच्या बाहेर समायोजन झाल्यानंतर आपले राजकीय वजन वापरुन संस्थाचालक व्यपगत झालेली पदे पुन्हा मिळवू शकतात. पुन्हा त्यांना मनमानीपणे पदे भरण्याचा मार्ग माेकळा होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...