आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या दहशतीने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची चेंगराचेंगरी; 380 कोंबड्यांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर - चिकसे येथील गांगेश्वर शिवारात असलेल्या मातोश्री पोल्ट्री फार्मजवळ काल रविवारी रात्री बिबट्या आला होता. कोंबड्या बंदिस्त जाळीत असल्याने बिबट्याला कोंबड्या फस्त करता आल्या नाही. मात्र, त्याने बराच वेळ पोल्ट्री फार्मजवळ डरकाळ्या फोडल्या. तसेच पोल्ट्री फार्मच्या जाळीवर पंजा मारून धुमाकूळ घातला. भीतीमुळे कोंबड्या चेंगरल्या गेल्या. त्यात ३८० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

येथील शेतकरी अविनाश पाटील यांचे चिकसे येथील गांगेश्वर शिवारात मातोश्री पोल्ट्री फार्म आहे. या ठिकाणी दोन शेड असून, त्यात प्रत्येकी ७ हजार ५०० कोंबड्या आहेत. पोल्ट्री फार्मपासून हाकेच्या अंतरावर रखवालदार राहतो. या ठिकाणी काल रविवारी रात्री अचानक बिबट्या आला. कोंबड्या बंदिस्त असल्याने बिबट्याला त्या फस्त करता आल्या नाही. मात्र, बिबट्याने बराचवेळ पोल्ट्री फार्मजवळ डरकाळ्या फोडल्या. भीतीमुळे कोंबड्याची चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३८० कोंबड्या मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, सुदैवाने पोल्ट्री फार्मजवळ राहणाऱ्या रखवालदारच्या घराजवळ बिबट्या गेला नाही. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनंतर सोमवारी बिबट्याच्या भीतीने मजूर, शेतकरी शेतात गेले नव्हते. गांगेश्वर व देशशिरवाडे शिवारात अनेक वर्षांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. अनेकवेळा बिबट्या नर मादीसह बछडे सुद्धा शेतकऱ्यांना दिसून आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्या, म्हशीचे पारडू बिबट्याने फस्त केले आहे. चार ते पाच शेतकऱ्यांचे प्रत्येकी ४-५ पशुधन बिबट्याने ठार केले आहे. या शिवारात आठ महिन्यांपूर्वी ५ वर्षाच्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. मात्र, वन विभाग या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी, शेतमजुरांवर बिबट्याने हल्ला केला तर जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

फटाके फोडावे... 
बिबट्याला पळवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी फटाके फोडावे. तसेच डब्यांचा आवाज करावा. मिरचीची पावडर व गोणपाटावर जुने ऑइल टाकून ते लावल्यास बिबट्या येणार नाही. चिकसे शिवारातील पोल्ट्री फार्मला उद्या मंगळवारी भेट देऊन पाहणी करणार आहे. -अरुण माळके, वनक्षेत्रपाल 
 

बातम्या आणखी आहेत...