आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला \'सीएम\'च्या गाडीसमाेर फेकले, तिला अपंगत्व; पण बाबासाहेबांच्या नावासाठी लढल्याचा मला अभिमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून ३९ वर्षांपूर्वी मी माझ्या तीन महिन्यांच्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकले. तिला कायमचे अपंगत्व झाले. गरिबी होतीच. नामांतरानंतरही ती कायम राहिली. नेत्यांनी तात्पुरती मदत केली. जगण्याचे हाल झाले. तरीही बाबासाहेबांच्या नावासाठी लढा देण्याचे समाधान आहे,' अशा भावना औरंगाबादेतील जमनाबाई अप्पाराव गायकवाड यांनी 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केला. तर मुलगी संगीता प्रधान म्हणतात की, 'आता मला माझ्या मुलांच्या भवितव्याची चिंता आहे...' 

 

औरंगाबादच्या आंदाेलनात त्याग करणाऱ्या जमनाबाईंची भावना 
कबीरनगरात राहणाऱ्या जमनाबाईं सांगतात, ' नामांतराला सरकारचा विरोध आहे, व ते होणे शक्य नाही, असे वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत केले होते. त्यामुळे समाजात संताप हाेता. चिकलठाणा विमानतळावर ते आले तेव्हा दलित पँथरचे नेते गंगाधर गाडेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. तेव्हा मी 'अरे, वसंतदादा... विद्यापीठ काय तुझ्या बापाचा हाय काय? आमच्या बापाचा नाव देयकाला तुला लाज वाटीत काय ?' असे म्हणत पाठीला बांधलेली तीन महिन्यांची पोरगी संगीता त्यांच्या गाडीसमोर फेकली. हा प्रकार पाहून एक पोलिसवाला म्हणाला, 'ये बाई, तुला काही अक्कल आहे का? लहान मुलीला असे कोणी गाडीसमोर झोकून देतात का?' मी म्हटलं 'अरे साहेबा, तू मला शहाणपण शिकू नगंस. मला जमनाबाई म्हणत्यात... आमच्या बाबासाहेबांच्या नावासाठी मी काय बी करंल..' या घटनेत संगीता डावा पायाने अपंग झाली. पुढे नामांतराच्या सभांमध्ये माझे सत्कार झाले. गंगाधर गाडेंमुळे मनपात तात्पुरती नोकरीही मिळाली. आता मोलमजुरी करते. नामांतरासाठी मुलगी लंगडी झाली. पण अनेकांनी बाबांच्या नावासाठी जीव दिला, हे कसं विसरू?'.. 

 

कायमचे अपंगत्व आलेल्या संगीता प्रधान म्हणतात... 
नामांतर दिन आला की काही पुढारी घरी येऊन साडी, फुलं देऊन माझ्यासोबत फोटो काढतात. पण कोणी आमच्या पोटापाण्याची कायमची व्यवस्था करत नाही. आईने आम्हाला थोडेफार शिकवले. लग्न करून दिले. आम्हा तिन्ही बहिणींचे लग्न झाले. वडील आणि दोन भावांचे निधन झाले. आता आम्ही चौघी मायलेकी आहोत. मी अपंग असल्यामुळे लग्न जमण्यात अडथळे आले. शेवटी एकदाचे झाले, पण पती मोलमजुरी करणाराच मिळाला. मलाही पाच मुली व एक मुलगा आहे. उदरनिर्वाहासाठी देवगिरी कॉलेजसमोर चहाची टपरी टाकली, मात्र तीही चालेना. मग गुलमंडीवर सुपारी हनुमानसमोर आई आणि मी बेलफूल विकत होतो. त्यातही कमाई होईना म्हणून आता भाज्या विकते. मागील वर्षी विद्यापीठातर्फे आम्हा दोघी मायलेकींचा सत्कार करण्यात आला. वाटले काही आर्थिक मदत होईल, पण झाली नाही. विद्यापीठाने दोन साड्या आणि बाबासाहेबांनी लिहिलेली १२ पुस्तके देऊन बोळवण केली. घाटीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. असे असले तरी मला दु:ख नाही. मात्र, आईचा काळ गेला, पण मला तर आता मुलांच्या भवितव्याचा विचार करावा लागेल. मुलींचे शिक्षण व लग्न कसे करू, हा प्रश्न मला सतत भेडसावतोय. '

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...