Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | 4 bikes founded in well

महामार्गाजवळ ६० फूट खोल विहिरीत आढळल्या ४ दुचाकी

प्रतिनिधी | | Update - Dec 09, 2018, 09:45 AM IST

याच विहिरीत काही महिन्यांपूर्वी अाढळून अाला हाेता मृतदेह

 • 4 bikes founded in well

  जळगाव : जळगाव-भुसावळ महामार्गालगत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत चार दुचाकी अाढळल्या. चोरट्यांनी या दुचाकी विहिरीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. चारही दुचाकी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

  एमएच १९ बीटी ५५७३ (हीरो होंडा स्प्लेंडर), एमएच १९ बीएक्स ३८८८ (बजाज पल्सर), एमएच १९ बीई (होंडा शाइन) व एमएच १९ सीडी ६५२४ (ड्रीम युगा) या दुचाकी विहिरीतून काढल्या. गोदावरी महाविद्यालयाजवळ असलेल्या जिमी महाजन यांच्या शेतातील विहिरीत दुचाकी फेकलेल्या असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नीलेश पाटील, अशोक सनकत यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी विहिरीतून एक दुचाकी काढली. रात्री अंधार पडल्यामुळे तसेच विहिरीत पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे रात्री काम थांबवण्यात आले. यानंतर शनिवारी दुपारी ११ वाजता विहिरीतील पाणी पंपाच्या साह्याने बाहेर काढले. यानंतर इब्राहिम शेख खाटीक, सलीमोद्दीन करीमोद्दीन, मुजाहीद शेख गनी व शकील शाह रुबाब शाह या चौघांनी दोरीच्या साह्याने पाण्यात उतरून आणखी तीन दुचाकी हुडकून काढल्या. क्रेनच्या मदतीने या दुचाकी विहिरीतून बाहेर काढून पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी खेडी गावातून दसऱ्याच्या दिवशीच चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दुचाकी मालकाने घटनास्थळी येऊन ओळख पटवली. इतर तीन दुचाकींचे नंबर मिळाले अाहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.


  याच विहिरीत काही महिन्यांपूर्वी अाढळून अाला हाेता मृतदेह
  जिमी महाजन यांच्या शेतातील ही विहीर ६० फूट खोल आहे. तर त्यात २० फुटांपर्यंत पाणी आहे. दुचाकी शोधण्यासाठी पंपाने पाणी बाहेर काढले. यानंतर चार पोलिस मित्रांनी मोठ्या कसरतीने दोरीच्या मदतीने पाण्यात उतरून दुचाकी शोधल्या. तळाशी गाळ, घाण, काटे, काचेचे तुकडे हाेते. अशा स्थितीत काठी व हाताने दुचाकी शोधल्या. याच विहिरीत काही महिन्यांपूर्वी एक मृतदेहही अाढळला हाेता.

  चोरट्यांनी दुचाकी फेकल्याचा संशय
  सर्व दुचाकी जळगाव शहरातील विविध भागांतून चोरीस गेलेल्या आहेत. चोरट्याने काही दिवस वापरून नंतर विकण्याचा प्रयत्न केलेला असावा. विक्री न झाल्यामुळे त्या विहिरीत फेकल्या असाव्या, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच संबंधित दुचाकी मालकांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे कळवले आहे.

Trending