Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 4 crore business deal jam in 4 days in market committee!

बाजार समितीत ४ दिवसांत चार कोटींचे व्यवहार ठप्प! व्यापाऱ्यांचा बंद चौथ्या दिवशीही सुरूच

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 12:18 PM IST

हमीभावानुसार धान्य खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंड व शिक्षा असा कायदा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

 • 4 crore business deal jam in 4 days in market committee!

  वाळकी- हमीभावानुसार धान्य खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंड व शिक्षा असा कायदा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य दुकानदारांनी शुक्रवारी चौथ्या दिवशीही आपले व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे चार दिवसांत तब्बल ४ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.


  शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबावी आणि आर्थिक गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी धान्य हमीभाव कायदा करण्याची घोषणा सरकारने केली. या कायद्यान्वये शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना ५० हजारांचा दंड आणि १ वर्ष कारावासाची तरतूद आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत असले, तरी व्यापाऱ्यांमधून मात्र विरोध आहे. त्यामुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी व्यवहार बंद ठेवले आहेत. बाजार समितीत दररोज ४०० ते ४५० क्विंटल धान्याची आवक होते. त्यात ज्वारी, गहू, बाजरी, मूग, तूर, हरबरा, सूर्यफूल, सोयाबीनसह इतरही काही पिकांचा समावेश असतो. त्यातून दररोज सुमारे १ कोटीची उलाढाल होते. चार दिवसांपासून आडत बाजार बंद असल्याने चार कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.


  शासनाकडून आदेशच नाहीत
  राज्य शासनाने हमीभावाबद्दल निर्णय घेतल्याचे आम्हाला वर्तमानपत्रांतून, तसेच अन्य प्रसारमाध्यमातूनच समजले. बाजार समितीला अजून कोणत्याही प्रकारचे शासन आदेश प्राप्त झालेले नाहीत. आम्ही व्यापाऱ्यांची बैठकही घेतली होती. शासन आदेश येत नाहीत तोपर्यंत व्यवहार सुरू ठेवावेत, असे आम्ही व्यापाऱ्यांना सांगितले, पण राज्यातील सर्वच खरेदी व्यवहार बंद असल्याने नगरमध्येही खरेदी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
  - अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर.


  तोडग्याची गरज
  शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी धान्य खरेदी हमीभाव निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पण व्यापाऱ्यांनी आता खरेदी बंद करत शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास सुरूवात केली आहे. भाजीपाला आडतीबाबत आडत खरेदीदाराकडून वसूल करावी, असा शासनाने निर्णय घेतला होता. त्यावेळीही खरेदीदारांनी विरोध केलाच होता, पण नंतर शासनाने सर्व बाबी स्पष्ट केल्यानंतर सर्व व्यवहार सुरू झाले व शेतकऱ्यांचा फायदा झाला. आताही शासनाने व्यापारी आणि शेतकरी यांच्या प्रतिनीधींशी बोलून तोडगा काढण्याची गरज आहे.

Trending