Sangali flood / सांगलीत ४ घरे कोसळली : स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय घरी परतू नका; प्रशासनाचे आवाहन

पूर ओसरलेल्या भागात साफसफाई करण्याच्या कामाला महापालिकेने प्राधान्य दिले आहे

दिव्य मराठी

Aug 13,2019 08:39:00 AM IST

सांगली - महापूर ओसरल्यानंतरही सांगलीकरांच्या मागील दुर्दैवाचा फेरा सुटण्याची चिन्हे नाहीत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावभागातील चार घरे कोसळली. त्यामुळे पुरात आठ दिवसांपासून असलेल्या घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय कोणीही आपल्या घरी परतू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी ५० फुटांवर असून ते अद्याप पूररेषेहून ५ फूट अधिक आहे. पूर ओसरलेल्या भागात साफसफाई करण्याच्या कामाला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या परिसरातील असंख्य जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारीही साफसफाई, मृत जनावरांची विल्हेवाट, औषध व जंतुनाशकांची फवारणी, ड्रेनेज सफाई, चिखल व गाळ काढणे अशी कामे होणार आहेत. गावभागातील मातीचे बांधकाम असलेली चार घरे पूर ओसरल्यानंतर कोसळली. त्यामुळे प्रशासनाने खातरजमा केल्याशिवाय कोणीही परस्पर आपल्या घरी राहण्यास जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

X