आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ; चाकूच्या धाकावर ४.५ लाखांना लुटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - चोरट्यांनी घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून नगदी ३० हजार रुपये, दोन मोबाइल, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून जवळपास साडेचार लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. गेवराई तालुक्यातील गढी येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी गेवराई पोलिसांत चार चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी साखर कारखान्यात मुख्य लेखाधिकारी म्हणून लक्ष्मण रामभाऊ नवले हे काम करतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास घरातील सर्व झोपी गेले होते. दरम्यान, शनिवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या छतावरून नवले यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी काही खोल्यांचे दरवाजे बंद करून घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील तसेच कपाटातून सोन्याचे ४ लाख २० हजार हजारांचे दागिने व ३० हजार, दोन मोबाइल असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. दरम्यान, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीदेखील गढी येथे जबरी चोरीच्या घटना घडलेल्या असून या घटनेचा अद्यापही शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे यासह अन्य चोऱ्यांचाही तातडीने पोलिसानी तपास करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.