आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 अल्पवयीनांचा तीन युवकांवर चाकूने हल्ला: एकाचा कापला गळा,छत्री तलावावरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात मागील काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यातही राजापेठ ठाण्याच्या हद्दीत तर सातत्याने चाकू हल्ले, भरदिवसा लूटमार अशा घटना वारंवार घडत आहे. यातच आणखी एका गंभीर घटनेची भर रविवारी (दि. १८) दुपारी पडली. छत्री तलावावर कॅमेरा घेवून फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तीन युवकांवर चार अल्पवयीन हल्लेखोरांना चाकूने हल्ला चढवला. यामध्ये एका २१ वर्षीय युवकाचा गळा चिरुन त्याला गंभीर जखमी केले आहे. राजापेठ पोलिसांनी या गंभीर प्रकरणात अल्पवयीन हल्लेखोरांविरुध्द कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले होते.


पलश डोंगरे, आकाश धोटे आणि एडविन गोतमारे असेे जखमी युवकांची नावेे आहेत. यामध्ये पलशच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला तर आकाशच्या पोटावर आणि एडविनच्या पाठीवर चाकू चालवण्यात आला आहे. हे तिघे तसेच मॅक्स पिल्ले व अन्य दोघे असे पाच ते सहा युवक रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास छत्री तलाव परिसरात फोटो शूटसाठी गेले होते. या वेळी त्यांच्याकडे छायाचित्रणासाठी कॅमेरासुद्धा होता. त्यांचे फोटोशूट सुरूच असताना तीन अल्पवयीन युवक त्यांच्याजवळ गेले आणि कॅमेरा हातात मागण्याचा हट्ट करत होते. या वेळी या पाच ते सहा जणांनी कॅमेरा दिला नाही. यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

 

याचवेळी अल्पवयीनांपैकी एकाने खिशात असलेला चाकू काढून पाच ते सहा जणांवर सपासप वार सुरू केलेत. या प्रसंगी तिघांनी वार चुकवले मात्र पलश डोंगरे, आकाश आणि एडविन यांना चाकूमुळे दुखापत झाली. यामध्ये पलशला तर गळ्यावरच चाकू मारल्यामुळे तो अत्यवस्थ झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एक व्हिडिओ रविवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र राजापेठ पोलिसांनी अल्पवयीन हल्लेखोरांविरुद्ध २४ हे कलम लावले आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीत वाढलेली गुन्हेगारी हद्दीत राजापेठ पोलिसांचा आणि शहर पोलिसांचा वचक संपल्याचे दर्शवणारा आहे.

बातम्या आणखी आहेत...