आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: रिक्षातील सहप्रवाशांकडून महिलेचे 45 हजार लंपास, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या चार घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विडीचे माप देण्यासाठी रिक्षातून जात असताना पिशवीत ठेवलेले ४५ हजार रुपये सहप्रवासी महिलेने पळविले. शुक्रवारी दुपारी आकाशवाणी केंद्र परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी देशपती (रा. गवळी वस्ती, गुरुदेव नगर) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. तीस वर्षीय संशयित महिलेवर गुन्हा दाखल झाला असून पोलिस शोध घेत आहेत. सौ. लक्ष्मी या विड्याचे माप देण्यासाठी जात होत्या. तेथून त्या परत सोन्याचे दगिने घेण्यासाठी जाणार होत्या. त्यामुळे ४५ हजार रुपये पिशवीत ठेवले होते. रिक्षामध्ये अगोदरची ती महिला बसली होती. क्यामा बिल्डिंग ते आकाशवाणी केंद्र या दरम्यान पैसे पळवण्यात आले. माप दिल्यानंतर पिशवीत पैसे नाहीत हे लक्षात आले.

 

दोन हजार काढून घेतले
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोर गनिफ पटेल (मजरेवाडी) यांना मारहाण करून दोन हजार काढून घेतले. शुक्रवारी रात्री सातला ही घटना घडली. एमएच १३ बीएन २३७५ या दुचाकीवरुन दोन तरुण आले होते. त्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
पटेल हे एसटी बस चालक आहेत. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पाच हजार रुपये सोबत आणले होते. दुचाकीवरून मित्रासोबत जात असताना दोन तरुणांनी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. तू माझ्या गाडीला कट मारलेस. त्याचे नुकसान झाले आहे, असे म्हणू लागले. पटेल यांनी आपण पोलिसात जाऊन काय नुकसान झाले आहे ते पाहू, असे म्हणत असताना दोघांनी मारहाण करून दोन हजार रुपये घेऊन पळून गेले.

 

चोराने लॅपटॉप पळवला
बोल्ली मंगल कार्यालयाजवळून जाताना तुकाराम येणगंट्टी (रा. शास्त्रीनगर) यांच्या पिशवीतील लॅपटॉप चोराने पळविला. शुक्रवारी जेलरोड पोलिसात तक्रार देण्यात आली. येणगंट्टी हे एका कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. एम.एच.१३ बीएच ७७७८ या दुचाकीला बॅगेत लॅपटॉप ठेवला होता. त्यांची नजर चुकवून चोराने डाव साधला.

 

रेल्वे स्थानकाजवळ पैसे काढून घेतले
रेल्वे स्थानकाजवळील ८५ नंबर गाळा येथे क्रॉसिंगसाठी गाडी थांबल्यानंतर दिनेश मायप्पा पुलोलम (रा. हैदराबाद, सध्या मोदीखाना सोलापूर) हे पायी जाताना मारहाण करून तीन हजार रुपये काढून घेण्यात आले. सदर बझार पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री सातला ही घटना घडली. संशयित म्हणून तीन- चार तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...