आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकमध्ये गुदमरुन 40 जनावरांचा मृत्यू; मध्य प्रदेशातून वर्धा जिल्ह्यात जात होता ट्रक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड- देशभरात जनावरांच्या कत्तलीवर बंदी असताना मध्य प्रदेशातून अजूनही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कत्तलीसाठी जनावरे आणली येत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्य प्रदेशातून वर्धा जिल्ह्यात जात असलेल्या एका ट्रकमध्ये तब्बल ६० जनावरे कोंबून भरण्यात आली होती. त्यापैकी ४० जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला, तर २० जनावरे सुद्धा मरणासन्न अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी ट्रकचालक मात्र घटना स्थळावरच ट्रक सोडून फरार झाला आहे. 

 

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील गाडेगाव ते नांदगाव फाटा दरम्यान असलेल्या पेट्रोलपंपनजीक एमपी ३३ जी ०५१२ या क्रमांकाचा टाटा आयशर एक्सल तुटल्यामुळे उभा होता. ट्रकपासून ये जा करणारे गावकरी व शेतकऱ्यांना ट्रकमधून दुर्गंधी येऊ लागल्याने काही जणांनी ट्रकमध्ये डोकावून पाहिले असता आतमध्ये जनावरे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी पोलिसांशी सपंर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. ट्रक भरून जनावरे असल्याची माहिती मिळताच वरूडचे ठाणेदार दीपक वानखडे हे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. तसेच बेनोड्याचे ठाणेदार सुनील पाटीले हे सुद्धा ताफ्यासह दाखल झाल्यावर आरोपीचे शाेध कार्य सुरू झाले. ट्रकच्या क्रमांकावरून ट्रक मालक व ट्रकचालकाचा शोध सुरू असून, या ट्रकमध्ये असलेल्या ६० जनावरांपैकी ४० जनावरांचा ट्रकमध्येच मृत्यू झाल्याचे दिसून आले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गावकरी, बजरंग दल, विहिंप व आजूबाजूच्या नागरिकांच्या सहकार्याने ट्रकमधील जनावरे बाहेर काढली. ही जनावरे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून वर्धा किंवा यवतमाळ जिल्ह्यात जात असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. बेनोडा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध १७ क, ५ ब, क व ७,९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध सुरू आहे.  

बातम्या आणखी आहेत...