आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआरसीचा 40 टक्के हिंदूंना फटका, डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचे नसेल तर लढाईला सज्ज राहण्याचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅड. आंबेडकरांचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून अराजक स्थिती
  • भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांची भीती
  • एनआरसी लागला तर 13 कोटींवर भटके "डिटेन्शन'मध्ये बंदिस्त होतील

​​​​​​नाशिक : हातावर पोट आणि पाठीवर बिऱ्हाड घेतलेले देशातील किमान १३ कोटी भटके विमुक्त लोक गेल्या सत्तर वर्षांपासून नागरिकत्वासाठी झगडा देत असताना, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यास ते पहिले बळी ठरतील, अशी भीती भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी व्यक्त केली. त्यांच्या आयोगाने दहा वर्षांपूर्वीच केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात देशातील १६२० भटक्या जातीजमातींचा ओळखपत्रांसाठी सुरू असलेला संघर्ष मांडला होता. स्वातंत्र्याआधीपासून या भूमीवर राहिलेले, परंतु केवळ कागदपत्रांआभावी नागरिकत्वापासून दूर राहिलेल्या या १३ कोटी भटक्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी डिटेन्शन छावण्यांमध्ये कोंबले जाण्याचा धोका त्यांनी दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर आंदोलने सुरू आहेत. मात्र, या कायद्याचा सर्वात पहिला फटका बसणारा समाज असंंघटित आणि पोरका असल्याने त्याचा आवाज कुठेच नोंदला जाताना दिसत नाही. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये भटक्या विमुक्तांच्या १६२० हून अधिक जाती-पोटजाती आहेत.

नोंद नसलेल्या सापडल्या २२७ जमाती

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात सरकारने रेणकेंच्या नेतृत्वात भटक्या विमुक्त समूहाचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी शिफारशी करण्याच्या उद्देशाने आयोगाची स्थापना केली होती. , १९३१ च्या जनगणनेत नोंद न झालेल्या, परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या २२७ जाती आयोगास सापडल्या होत्या. भटक्यांच्या नोंदी करण्यासाठी स्वतंंत्र मोहीम राबविण्याची शिफारस रेणके आयोगाने केंद्राला केली होती. त्याची अंमलबजावणी न करता, कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व सिद्ध करण्याची प्रक्रिया राबविल्यास, १३ कोटी भटके विमुक्त डिटेन्शन छावण्यांमध्ये कोंबले जातील.

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात (सीएए व एनआरसी) गुरुवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विशाल धरणे आंदोलन करण्यात आले. या कायद्याचा मुस्लिमांसह देशातील ४० टक्के हिंदूंना फटका बसणार आहे, असा आरोप वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. छळछावणीत (डिटेन्शन कॅम्प) मध्ये जायचे नसेल तर मोदी-शहा, संघ व भाजप यांच्याविरोधातील लढाईला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.


गुरुवारी दुपारी दादर टीटी येथील खोदाद सर्कल येथे वंचित आघाडीचे आंदोलन पार पडले. सुमारे ५ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अॅड. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात अराजक स्थिती निर्माण करत आहेत. ज्यांना आपला बाप कधी जन्मला, आजोबा केव्हा मेला याची माहिती नाही त्यांना आता कागदपत्रे मागितली जात आहेत. या कायद्याचा फटका मुस्लिम समाजाला तर बसणार आहेच, पण हिंदू धर्मातील ४० टक्के जनतेला याचा फटका बसेल. त्यात सर्वाधिक ससेहोलपट आदिवासी, भटके विमुक्त आणि बारा बलुतेदार यांची होणार आहे, असा आरोप त्यांनी केला.

मानवतावाद्यांविरोधात या कायद्याचा वापर होईल

जे संविधानाला मानतात, नागरिकत्व सुधारणा कायदा त्यांच्या विरोधात आहे. या कायद्याचा वापर डावे, समाजवादी, आंबेडकरवादी, मानवतावादी यांच्याविरोधात केला जाईल, असा आरोप आंबेडकर यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या दारुण पराभवानंतर आंबेडकर यांचा हा पहिलाच राजकीय कार्यक्रम होता.

रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्याच हातात शोभायचा, आत्ताची परिस्थिती देशाचे विभाजन करण्यासारखीच : संजय राऊत

नाशिक : देशात हिंसाचार का होतोय व ताे घडवण्यासाठी प्रेरणा कुणाची आहे याचा शाेध घेणे गरजेचे आहे. सीएए व एनआरसीवरून आत्ताची जी परिस्थिती आहे ती देशाचे विभाजन करण्यासारखी झाली असून अराजकता माजवली जात असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी नाशकात केली.

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन साेहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बाेलत हाेते. येत्या ३० तारखेला १२ ते १ च्यादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात काेणताही बदल होणार नाही. शरद पवार यांच्या कामाची पद्धत वेगळी आहेे. परिवर्तनासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हेच हाेते. मात्र, रिमाेट कंट्राेल फक्त बाळासाहेबांच्याच हातात शाेभत हाेता. देशातील सद्य:स्थितीचे चित्र बघता पंतप्रधान माेदी व गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. दरम्यान, येत्या सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री पायलट यांचा आरोप, देशभरात हिंसाचार, मात्र सरकार कायदा मागे घ्यायला तयार नाही... 

पुणे : भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वाला तिलांजली देणारा नागरिकत्व दुरुस्ती कायदा असून केवळ मूलभूत प्रश्नांपासूून देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकारने देशात अशांतता माजेल, असा कायदा केला आहे. देशात १९ लोकांना हिंसाचारात प्राण गमावावे लागले आहेत. मात्र, सरकारमधील नेतेमंडळी अहंकारी वृत्तीने तो मागे घ्यायला तयार नाही. वास्तविक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देश एका मोठ्या संक्रमणाच्या काळातून जाताना लोक बेरोजगार बनत आहेत. हे सर्व लपवण्यासाठी सरकार देशात गोंधळ निर्माण करून देशासमोरील मुख्य प्रश्नावरून लक्ष हटवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. केवळ भारतीय संविधानामुळे लोकांमधील एकजूट टिकून आहे, असा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणताही कायदा संविधानिक मापदंडात बसत नसेल तर तो रद्द करावा लागतो. केंद्र सरकारने भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारा कायदा तत्काळ रद्द करावा.

डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांचा पुण्यात आरोप, एनआरसी माध्यमातून मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा प्रयत्न.. 

पुणे : केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिकत्व नाेंदणी (एनआरसी) कायद्याच्या माध्यमातून घटनेच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करत आहेत. पाेलिस बळाचा वापर करून मतस्वातंत्र्याची गळचेपी सुरू असून गाेमांस , तिहेरी तलाक, गाेहत्या अशा मुद्द्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. एनआरसीच्या तसेच विविध माध्यमांतून देशातील १४ काेटी मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा प्रयत्न असून त्याला आमचा विराेध आहे. 

शेजारील देशातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्यास सरकारचा विराेध आहे, परंतु पाकिस्तानमध्ये ९० टक्के, तर बांगलादेशमध्ये ९९ टक्के मुस्लिम हे धर्मांतरित हिंदू असल्याचे मत डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केले आहे. या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गाेपाळ तिवारी उपस्थित हाेते. मुणगेकर म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसीला मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात त्याच्याविराेधात वणवा पेटला. भाजप आणि संघ वगळता सर्व पक्षांचे लाेक, विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...