आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरस्वती'च्या साधकांनी अर्ध्या तासात साकारल्या ४०० गणेशमूर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी 'दिव्य मराठी'ने केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबादकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सोमवारी(दि.३) या अभियानांतर्गत शहरातील सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांना मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. केवळ अर्ध्या तासांत ४०० विद्यार्थ्यांनी गणेशाच्या सुबक मूर्ती तयार करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल टाकले. 'दिव्य मराठी', रोटरी क्लब आणि एकता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. 


पीआेपीच्या मूर्तींचे अर्धवट होणारे विघटन यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होण्याबरोबरच जलसाठे प्रदूषित होतात. यामुळे "दिव्य मराठी'ने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती अभियान हाती घेतले आहे. त्यातून मातीच्या गणेश मूर्तीचा पर्याय मांडण्यात आला आहे. रोहिणी नायगावकर यांनी 'दिव्य मराठी'कडून प्रेरणा घेऊन दोन वर्षांपासून घरीच मातीची गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. यावर्षी त्यांनी विविध सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालयात जाऊन मातीच्या मूर्ती कशा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यातून १५ दिवसांत ११०० हून अधिक मातीच्या गणेश मूर्ती साकारल्या आहेत. सोमवारी (दि.३) शहरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांना मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 


कार्यक्रमासाठी मान्यवरांचा पुढाकार 
कार्यक्रमासाठी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, लघु उद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष रमेश सारडा, क्रेडाईचे अध्यक्ष आशिष पवार, पत्रकार तानाजी जाधवर, सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, वैशाली पवार, प्रशिक्षक रोहिणी नायगावकर, मुकेश नायगावकर, पिंपळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित पवार, सचिव रणजित रणदिवे, एकता फाउंडेशनचे अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, सचिव अभिलाष लोमटे, दिव्य मराठीचे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख आदींची उपस्थिती होती. 


गुरुवारी भोसले हायस्कूलच्या प्रांगणात कार्यशाळा
"दिव्य मराठी'च्या आवाहनानंतर आता शाळा, महाविद्यालयांनी मातीची गणेश मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये ६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी अन्य शाळांतील विद्यार्थी व नागरिक सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यानी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी केले आहे. 


हे तर विधायक पाऊल 
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी 'दिव्य मराठी'कडून प्रेरणा घेऊन उस्मानाबादकरांनी टाकलेले हे विधायक पाऊल असून, यामुळे पाण्याची बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे रोहिणी नायगावकर म्हणाल्या. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांनीही 'दिव्य मराठी', रोटरी क्लब आणि एकता फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

बातम्या आणखी आहेत...