आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 मंत्र्यांचे खातेवाटप, मुख्यमंत्र्यांनी टाळला खात्यांचा माेह; राष्ट्रवादीच्या हाती तिजोरीच्या चाव्या!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहा दिवसांनी रविवारी ४३ मंत्र्यांचे खातेवाटप मार्गी लागले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत नगरविकास, गृह यासारखी महत्त्वाची खाती ताब्यात ठेवण्याची 'परंपरा' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी माेडून काढली. प्रशासकीय अनुभवाचा तुटवडा व प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी या खात्यांचा 'तणाव' व 'माेह' टाळल्याचे मानले जाते. दुसरीकडे गृह, जलसंपदा, अर्थ, गृहनिर्माण यासारखी वजनदार खाती राष्ट्रवादीकडे घेऊन शरद पवार यांनी सरकारमध्येच 'आपलीच पाॅवर' चालणार असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले अाहेत. राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सुमारे २ लाख ५० हजार कोटींचा आहे. पैकी एकट्या राष्ट्रवादीच्या वाट्यास गेलेल्या खात्यांचा वाटा सुमारे १ लाख २० हजार कोटी इतका आहे.

आदित्यकडे पर्यावरण, पर्यटन

शिवसेनेच्या वाट्यास कमी महत्त्वाची खाती आली आहेत. ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय अशी मोजकीच खाती ठेवली. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती साेपवून ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. मात्र अदलाबदलीत शिंदेंकडील गृह खाते राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांकडे साेपवावे लागले. सुभाष देसाई यांना उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार खात्यांची धुरा आहे, तर कृषी खाते दादाजी भुसेंकडे दिले अाहे.

मंत्रिमंडळात मराठवाडा


१. अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 
२. धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य
३. राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण 
४. अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य 
५. संदिपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन 
६. अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य 
७. संजय बनसोडे : पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण

राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते साेपवले. जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण, हसन मुश्रीफ यांना ग्रामविकास खाते दिले. दिलीप वळसे पाटील यांना उत्पादन शुल्क आणि छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाती देण्यात अाली. काँग्रेसकडे अालेली महत्त्वाची दाेन खाती महसूल व सार्वजनिक बांधकाम ही अनुक्रमे बाळासाहेब थाेरात व अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात अाली. नितीन राऊत यांना ऊर्जा, के. सी. पाडवी यांना आदिवासी विकास, तर वर्षा गायकवाड यांना शालेय शिक्षण खाते देण्यात अाले.

  • नगरविकास : एकनाथ शिंदे
  • महसूल : बाळासाहेब थाेरात
  • जलसंपदा : जयंत पाटील
  • अर्थ : अजित पवार
  • सामाजिक न्याय : धनंजय मुंडे

लक्षात राहणार नाहीत इतकी खाती माझ्याकडे दिलीत : बच्चू कडू


१. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तब्बल पाच खात्यांची धुरा अाहे. 'माझ्याच लक्षात राहणार नाहीत इतकी खाती मला न मागता मिळाली आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
२. गृह व वने ही दोन्ही खाती पुन्हा विदर्भाच्या वाट्यास गेली. पूर्वीच्या सरकारामध्ये गृह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर) यांच्याकडे, तर वने चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होते.
३. अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील गृह विभागासाठी इच्छुक होते, मात्र विदर्भातील अनिल देशमुख यांची वर्णी लागली.
४. काँग्रेस आणि सेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांच्या योजनांना निधी अर्थमंत्री अजित पवार देतील. एक प्रकारे तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हाती.
५. सामाजिक न्याय खाते शक्यतो अनुसूचित जातीतून आलेल्या मंत्र्यांकडे असते. या वेळी ते वंजारी समाजातून अालेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवले आहे.

ठाकरे मंत्रिमंडळाचे खातेवाटप


१. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय, खाती
२. अजित पवार (उपमुख्यमंत्री) : अर्थ, नियोजन
३. सुभाष देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
४. अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
५. छगन भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
६. दिलीप वळसे- पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क
७. जयंत राजाराम पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
८. नवाब मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
९. अनिल देशमुख : गृह
१०. बाळासाहेब (विजय) थोरात : महसूल
११. राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन
१२. राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
१३. हसन मुश्रीफ : ग्रामविकास
१४. डॉ. नितीन राऊत : ऊर्जा
१५. वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण
१६. डॉ. जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण
१७. एकनाथ शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
१८. सुनील केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
१९. विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन
२०. अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
२१. उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
२२. दादाजी भुसे : कृषी, माजी सैनिक कल्याण
२३. संजय राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
२४. गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता
२५. के. सी. पाडवी : आदिवासी विकास
२६. संदिपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन
२७. बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील : सहकार, पणन
२८. ॲड. अनिल परब : परिवहन, संसदीय कार्य
२९. अस्लम शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
३०. यशोमती ठाकूर- सोनवणे : महिला व बालविकास
३१. शंकरराव गडाख : मृद व जलसंधारण
३२. धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
३३. आदित्य उद्धव ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री


१. अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
२. सतेज पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
३. शंभुराज देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
४. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार.
५. दत्तात्रय भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन.
६. डॉ. विश्वजित कदम : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा.
७. राजेंद्र यड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य.
८. संजय बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य.
९. प्राजक्त तनपुरे : नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन.
१०. आदिती तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क.

बातम्या आणखी आहेत...