आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या ‘गांधीतीर्थ’त गांधीजींच्या ४८ डायऱ्या, ५ लाखांवर पानांचे डिजिटल दस्तऐवज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास पाटील

जळगाव - सत्य, अहिंसा व शांतीचा संदेश जगाला देणारे महान नायक, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संपूर्ण जीवन कार्यावरील जगातील पहिले ऑडिअो गायडेड मल्टिमीडिया म्युझियम असलेले गांधीतीर्थ हे जळगावातील निसर्गरम्य जैन हिल्सवर साकारले आहे. गांधीजींचा मोहनदास ते महात्मा हा प्रवास, त्यांच्या सर्वच्या सर्व ४८ आेरिजनल डायऱ्या, स्वत: लिहिलेल्या सर्व पुस्तकांच्या प्रथम आवृत्या, ५ लाख २० हजार पानांचे डिजिटल दस्तऐवज, गांधीजींच्या भाषणांचे ऑडिआे, व्हिडिअो, त्यांच्या जीवन कार्यावरील ५ हजार छायाचित्र, असा मौल्यवान ठेवा एकाच छताखाली गांधीतीर्थ येथे उपलब्ध असल्याने जगभरातील अभ्यासक, संशोधक व पर्यटकांची पावले जळगावात पडू लागली आहेत. हे संग्रहालय पाहून ते थक्क होत आहेत.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ गांधी विचारवादी व जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांनी गांधीजींचे विचार जगभर पोहचावेत, भावी पिढी त्यांच्या विचारांनी संस्कारीत व्हावी, त्यांच्या विचारांवर चालावी, यासाठी गांधीतीर्थची उभारणी केली. ३० जून २०१० रोजी सुरुवात झाली अन् २५ मार्च २०१२ मध्ये (अवघ्या १६ महिने २० दिवसांत) पूर्ण झाले. गांधीजींबाबत कुठलाही दस्तऐवज हवा असल्यास आज जगभरातील अभ्यासक, संशोधक, गांधीप्रेमी गांधीतीर्थ येथे धाव घेतात, जळगावकरांसाठी ही अभिमानाचीच बाब आहे. 

पर्यावरणपूरक इमारतीचे सर्व मानक पूर्ण करणारी इमारत :
देशात ९ हजार, महाराष्ट्रात १३२ व नव्याने होऊ घातलेले ४६ संग्रहालये आहेत. मात्र, गांधीतीर्थ येथील ‘खोज गांधीजीकी’ हे संग्रहालय आगळे-वेगळे असे आहे. पर्यावरणपूरक इमारतीचे सर्व मानक पूर्ण केले आहेत. त्यामुळे ग्रीहा या संस्थेने फाइव्ह स्टार तर ‘लीडस्’ने प्लाटिनम रेटिंग दिले आहे. देश, विदेशात महात्मा गांधी यांच्या जीवनावर अनेक संग्रहालय आहेत; मात्र एकाच छताखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य असलेले व पर्यावरण पूरक इमारतीत असलेले हे देशातील एकमेव संग्रहालय आहे. 

जगभरात विखुरलेले साहित्य, वस्तू, दस्तऐवजचे जतन व संवर्धन : गांधीजी यांचे साहित्य, वस्तू, दस्तऐवज जगभर विखुरलेले आहे. ते जेथे मिळेल तेथून गोळा करण्याचे काम गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अव्याहतपणे सुरू आहे. संग्रह करुन त्यांचे संगणकीकरण, जतन व संवर्धनाचे मोलाचे काम (कलेक्शन, डिजिटलायझेशन, कंझरवेशन व प्रिझर्व्हेशन) येथे केले जाते. त्यासाठी पुराभिलेखागार प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. 


महात्मा गांधीजींच्या ४८ व कस्तुरबांची एकमेव डायरी
 :
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील सर्वच्या सर्व ४८ डायऱ्या या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य आहे. गांधीजी यांचे स्वीय सहायक असलेले महादेवभाई देसाई यांनी त्या लिहिल्या आहेत. तसेच कस्तुरबा गांधी यांची एकमेव डायरी सुध्दा येथे उपलब्ध आहे. गांधीजींशी संबंधित ५ लाख २० हजार पाने संगणकीकृत करण्यात आली असून ५ हजार छायाचित्र, गांधीजींनी स्वत: लिहिलेल्या सर्व पुस्तकांच्या प्रथम आवृत्या, नवजीवन, यंग इंडिया, हरिजन सेवक या गांधीजींनी स्वत: संपादित केलेले साप्ताहिकाचे आेरिजनल अंकही या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. गांधीजींचे देशभरात अनेक ठिकाणी झालेले भाषण येथील संग्रहालयात एेकायला मिळते. १५२ ऑडियो स्पिचेस, ८५ फिल्मस् व फुटेजेस व ११ हजार पुस्तकेही येथे आहेत. पुस्तकांसाठी मोठी लायब्ररी उभारण्यात आलेली आहे. 
गांधीजींच्या वस्तू व ११९ देशांचे डाक तिकिटेही संग्रहालयात : फैजपूर येथे १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागात पहिलेच अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात गांधीजींचा सत्कार ज्या सुताच्या हाराने झाला तो हार, पादत्राणे तसेच ११९ देशांनी प्रसिद्ध केलेले डाक तिकिटेही येथे उपलब्ध आहेत. विनोबा भावे यांचे सर्व साहित्य व ३५० ऑडिअो भाषणेही गांधीतीर्थ येथे आहेत. 

गांधीजींच्या स्वप्नपूर्तीसाठी १५० खेड्यांमध्ये शाश्वत विकास :
देशातील खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे, हे गांधीजींचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी देशातील सात राज्यांतील १५० खेड्यांमध्ये शाश्वत विकास करण्याचे काम गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सुरू आहे. यात जळगाव जिल्ह्यातील २२ गावांचा समावेश आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावांचा विकास करण्यात येत आहे. 

३० देशांतील महिलांकडून पिंपळाच्या वृक्षाचे रोपण :
गांधीतीर्थवरील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभरात शांततेवर काम करणाऱ्या ३० देशांतील महिलांनी एकत्र येत त्यांच्या देशाची माती आणून ती येथे एकत्र केली. जागतिक शांतता व अहिंसेचे प्रतीक म्हणून पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे. 
 

जपान, फ्रान्स व सिंगापुरातही पोहोचले गांधी विचार 
गांधीजींचे विचार समजून घेऊन ते आचरणात आणता यावे, यासाठी जर्मनीचे ३ विद्यार्थी व देशभरातून ६ संशोधक गांधीतीर्थवर सध्या अभ्यास करीत आहेत. तर १८ विद्यार्थी पूर्णवेळ गांधीजींच्या जीवनावरील वर्षभराचा अभ्यासक्रमपूर्ण करीत आहेत. महाराष्ट्रासह ८ राज्य व जपान, फ्रान्स व सिंगापूर येथील विद्यार्थी ही परीक्षा देतात. १८ लाख २७ हजार लाेकांपर्यंत गांधीजींचे विचार या परीक्षेच्या माध्यमातून पोहोचवण्यात गांधी रिसर्च फाउंडेशनला यश मिळाले आहे. 
 
 

जगभरातील अभ्यासकांना गांधीतीर्थाची भुरळ 
हेमाडपंथी मंदिराच्या शैलीप्रमाणे या संग्रहालयाची उभारणी झाली आहे. ८१ हजार स्क्वेअर फूट एवढे बांधकाम आहे. निसर्गरम्य परिसर व त्यात गांधीजींच्या जीवन कार्यावरील खजिना येथे अभ्यासकांना उपलब्ध होत असल्याने जगभरातील संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी व गांधीप्रेमींना या संग्रहालयाने भुरळ घातली आहे. जर्मनी, जपान, अमेरिका, युरोपला गांधी विचारांचे अाकर्षण असल्याने या संग्रहालयाला भेट देणाऱ्यांचे या देशातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी ४८ ते ५५ हजार पर्यटक तर आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांनी येथे भेट दिली आहे. 
 

आजची तरुणाई टेक्नोसॅव्ही
आजची तरुणाई टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा अधिक प्रिय वाटते. त्याच भाषेत महात्मा गांधी यांचे विचार तरुणाईपर्यंत पोहाेचवण्याची क्षमता गांधीतीर्थ येथे आहे. तरुणांनी या संग्रहालयाला अवश्य भेट देऊन गांधीजी समजून घ्यावेत. 
-तुषार गांधी, महात्मा गांधी यांचे नातू

बातम्या आणखी आहेत...