आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळा चारा छावणीत दुभत्या गायींसह ५ जनावरांचा मृत्यू; उष्णतेपासून जनावरांच्या बचावासाठी २६ कुलर बसवल्याचा देखावा केला होता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - भीषण दुष्काळी परिस्थितीत जनावरांची आबाळ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी ती संरक्षित चारा छावणीत ठेवली खरी. परंतु, खंडाळा येथील चारा छावणीत चारा पाणी, सावलीच्या निष्काळजीपणामुळे दोन दुभत्या गायी व तीन वासरे अशा पाच जनावरांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान,तालुका प्रशासनाच्या कचेरीत पशुवैद्यकीय विभागाने जनावरे मृत झाल्याचा पाठवलेला अहवाल पोहचला नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा अहवाल हरवला की दडपला अशी चर्चा आहे. 


खंडाळा येथे पैठण तालुक्यात बालानगर येथील संत तुकाराम बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढाकाराने १५ एप्रिलला संरक्षित चारा छावणी सुरू झाली. एकूण १ हजार ८२२ जनावरे येथे आहेत. यातील ५ जनावराचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुधन मालकांनी केला आहे. ही माहिती महसूल प्रशासनाला कळवली आहे. जनावरांच्या शवविच्छेदनाचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत, असे खंडाळा येथील पशुधन अधिकारी डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.

उष्णतेपासून जनावरांच्या बचावासाठी २६ कुलर बसवल्याचा देखावा चारा छावणीचालकांनी एक दिवस केला. आता प्रत्यक्षात जनावरे मात्र परिसरातील चिंचेच्या झाडाखाली उभी राहतात.