आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- अकोल्याचाच भाग असलेल्या मलकापूर, अंबिकानगर भागामध्ये डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण आढळले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या बाबत हिवताप विभागाला माहिती प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसणे हे प्रमुख कारण समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमन उसके मलकापूर, पूनम चव्हाण मलकापूर, प्रभावती नाळे अंबिकानगर, आर्यन चव्हाण अंबिकानगर आणि राजेश सदाशिव पिल कॉलनी मलकापूर या पाच जणांवर उपचार करण्यात आले. विविध खासगी रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली. रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती आहे.
ज्या भागामध्ये संशयित रुग्ण आढळतात, त्या भागात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जलताप सर्वेक्षण, रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन ते तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येतात. ज्या भागामध्ये डेंग्यू, हिवतापाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळतात, तेथील पाणी साठवणूक साधनांची पाहणी, डास अळ्या आढळल्यास त्या नष्ट करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येते. तसेच तुंबलेले पाणी वाहते करण्यात येते, हिवताप नियंत्रणासाठी धूर फवारणी करण्यात येते. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष पुरवावे. सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावण्याकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात येते, त्या दृष्टीने आरोग्य खात्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून काळजी घेतल्या जात असल्याचेे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
उपचार पद्धतीत बदल
हिवतापापासून नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून पूर्वी क्लोरोक्विनच्या गोळ्या देण्यात येत होत्या. परंतु आैषधाची नासाडी होत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने उपचार पद्धती बदलण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता संबंधित रुग्णांचे रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येतात. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या आतील बाजूस खुपणे, शौच रक्तमिश्रित होणे, रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक (हिवताप) डॉ. अभिनव भुते यांनी केले आहे. तसेच डेंग्यूची शक्यता असणाऱ्या रुग्णांना अॅस्पिरिन किंवा ब्रुफेन गोळ्या वर्ज्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जुलैपर्यंत ८ रुग्ण डेंग्यू बाधित
जानेवारी ते जुलै १८ दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १७५ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यातील २० पॉझिटिव्ह आढळले त्यातून ८ रुग्ण डेंग्यू बाधित तर १२ संशयित रुग्ण होते. तर, महापालिका क्षेत्रात ३५ रुग्णांपैकी १७ पॉझिटिव्ह आढळले, त्यातील २ बाधित तर १५ संशयित रुग्ण आढळले.
आरोग्य उपसंचालक कार्यालयाजवळ घाण
विभागाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ज्या कार्यालयावर आहे त्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरातच (प्रशिक्षणार्थी निवासस्थानाला लागून) मोकळ्या जागेत घाण दिसून येते. या ठिकाणी डुकरे फिरताना दिसतात. या भागातील स्वच्छतेचे काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.