आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची काच फोडून पाच लाख लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 अंबाजोगाई- अादल्या दिवशी पान मटेरियलवर विक्री झालेल्या साहित्यातून पाच लाख रुपयांची रोकड आली होती. ती बँकेत भरण्यासाठी कारमध्ये ठेवून पान मटेरियलचे दुकान उघडण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांची रक्कम दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी कारची काच फोडून लांबवली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातील प्रशांतनगर भागातील अंबाजोगाई पीपल्स बँकेसमोर घडली. पाच लाख रुपयांची बॅग लांबवणारे दुचाकीवरील दोन संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


अंबाजोगाई शहरातील ईश्वर प्रसाद लोहिया यांचे प्रशांतनगर भागातील अंबाजोगाई पीपल्स बँकेसमोर पान मटेरियलचे दुकान आहे. सोमवारी दिवसभर दुकानात विक्री केलेल्या वस्तूंची पाच लाख रुपयांची रोकड जमा करून त्यांनी अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या चलनावर भरून ठेवली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता लोहिया हे त्यांच्या दुकानासमोर कार उभी करून दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा हीच संधी साधून त्यांच्या पाळतीवरील दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या कारच्या दरवाजाची काच फोडून काही वेळातच पाच लाख रुपये असलेली बॅग लांबवली. दुकान उघडल्यानंतर कारमधील रोकड आणण्यासाठी लोहिया हे कारजवळ गेले असता त्यांना कारची काच फोडून आतील पाच लाख रुपये ठेवलेली बॅग चोरांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना देताच सहायक पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 


पोलिसांनी फुटेजच्या आधारे फिरवली तपासाची चक्रे 
अंबाजोगाई शहर पोलिसांनी योगेश्वरी पतसंस्था गोकुळ बिअरबार व लोहिया पान मटेरियल या तीन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज घेतले अाहे. प्रशांतनगर येथे कारमधील पाच लाख रुपये लांबवणारे दुचाकीवरील दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. लवकरच चोर हाती लागतील, असे सहायक पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले. 


सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे पोलिसांचे आवाहन : दुष्काळामुळे सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी निवासी कॉलनीतील नागरिकांनी आपापल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गित्ते यांनी केले आहे. आठवडी बाजाराचा चोर घेताहेत चांगलाच फायदा 
अंबाजोगाई त मंगळवारी आठवडी बाजार असतो. त्यामुळे मोंढा भागात महिला व पुरुष बाजारकरूंची मोठी गर्दी दिसते. बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार वाढत आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणे, पाकीटमारी होत आहे. काही कॉलनीत घुसून महिलांना रूम आहेत का अशी चौकशी करून दागिने चोरीचे प्रकार सुद्धा घडत आहेत. पोलिसांनी बाजारदिवशी जास्तीचा बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...