Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | 50 smart buses Wil Run In First stage In Nasik city

पहिल्या टप्प्यात शहरात धावणार ५० स्मार्ट बसेस, हळूहळू वाढवत आकडा नेणार 400 वर

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 11:15 AM IST

तक्रारींचा पाऊस: पाच ठेकेदारांची निविदापूर्व बैठकीला हजेरी, विविध शंका-कुशंका केल्या उपस्थित

 • 50 smart buses Wil Run In First stage In Nasik city

  नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्राेजेक्टपैकी एक असलेल्या खासगीकरणातून शहर बससेवा चालवण्याचा प्रस्ताव अाता अंतिम टप्प्यात अाला असून बससेवेचे सुकाणू ठेकेदाराकडे गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरात धावणार अाहेत. त्यानंतर हळूहळू बसची संख्या वाढवत नेऊन ४०० इतक्या केल्या जाणार असून पालिका ज्या भागात बससेवा सुरू करेल तेथील बससेवा हळूहळू राज्य परिवहन महामंडळ बंद करणार अाहे. दरम्यान, निविदापूर्व बैठकीला पाच-सहा ठेकेदारांनी हजेरी लावून विविध प्रकारच्या शंका-कुशंका उपस्थित केल्या.
  नाशिक महापालिकेच्या क्षेत्रामध्ये राज्य परिवहन महामंडळामार्फत बससेवा चालवली जाते; मात्र ही सेवा ताेट्यात असल्याचे कारण देत परिवहन महामंडळाने बससेवा पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. दाेन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतले असल्यामुळे त्यांना वेगळे काही तरी करून दाखवण्याचे अाव्हान अाहे. अशा परिस्थितीत महापालिकेची अार्थिक स्थिती नाजूक असताना त्यांनी शहर बससेवा खासगीकरणातून चालवण्याचे शिवधनुष्य उचलले. वास्तविक, अाजघडीला राज्यातील अनेक महापालिका बससेवा चालवल्यामुळे अार्थिक विकलांग झालेल्या अाहेत. दरम्यान, नाशिक महापालिकेने बससेवेला मंजुरी दिल्यानंतर २३ जानेवारीच्या सुमारास या कामासाठी इच्छुक ठेकेदारांना निविदेद्वारे अामंत्रित केले अाहे. पहिल्या टप्प्यात बस पुरवण्यापासून तर व्यवस्थापनापर्यंतच्या कामासाठी ठेकेदार निवडला जात अाहे. दरम्यान, निविदा काढल्यानंतर नियमानुसार ठेकेदारांच्या शंका-कुशंका जाणुन घेण्यासाठी प्रीबीड बैठक हाेते. ही बैठक गुरुवारी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उपअभियंता बाजीराव माळी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस पाच ते सहा ठेकेदार उपस्थित हाेते. बससेवेची प्राथमिक माहिती देण्यात अाली. दरम्यान, वर्क अाॅर्डर मिळाल्यानंतर चार महिन्यानंतर ५० बसेस सुरू करणे अपेक्षित अाहे. मात्र ठेकेदारांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली. बसेस तयार करणे, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील उत्पादन यात वेळ जाईल, अशी शंका उपस्थित केली.


  असे अाहेत प्रस्तावित डेपाे
  नाशिकराेड अागार, सिन्नर फाटा
  अाैरंगाबादनाका अागार, साधुग्रामजवळ
  पाथर्डी फाटा अागार (जकात नाक्याजवळ)
  सीबीएस, अानंदनगर, सातपूर, नाशिकराेड (भाडेतत्त्वावर) ,


  अशा अाहेत बसेस
  २०० सीएनजी
  १५० इलेक्ट्रिकल
  ५० डिझेल


  २०० काेटींच्या वार्षिक उलाढालीवर अाक्षेप
  दहा वर्षे मुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या ठेक्यात वार्षिक उलाढाल २०० काेटींच्या अासपास असणे अपेक्षित असून त्यास काही ठेकेदारांनी हरकत घेतली. मात्र, यात ज्यांची कपॅसिटी कमी त्यांच्याकडून अशा हरकती स्वाभाविक असल्यामुळे पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. बस चालवण्याचा किमान अनुभव, बसेसची उंची, त्याचा ग्राउंड क्लिअरन्स अधिक करावा, जेणेकरून स्पीडब्रेकर्समुळे नुकसान हाेणार नाही याकडे ठेकेदारांनी लक्ष वेधले. ११ मार्च ही निविदा भरण्यासाठी अंतिम मुदत असून माेठे काम असल्यामुळे निविदा कालावधी वाढवावा, अशी मागणी करण्यात अाली.


  बस डेपाे कधी बांधणार?
  ठेका मिळाल्यानंतर बसेस तयार मात्र पालिकेकडून निर्मिती हाेणाऱ्या डेपाेसह अन्य पायाभूत सुविधांचे काय असाही सवाल करण्यात अाला. त्यावर पालिका अधिकाऱ्यांनी अाडगाव ट्रक टर्मिनल येथील बस डेपाेचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी असल्याचे सांगून प्रथम अानंदनगर येथील बस डेपाेतून अाॅपरेशन सुरू हाेईल असे स्पष्ट केले. बसेसच्या रुटबाबत ठेकेदारांची माहिती विचारली.


  अाडगाव बस डेपाेसाठी १९ काेटी हाेणार खर्च
  अाडगाव येथील ट्रक टर्मिनल्सशेजारील जागेत १९ काेटी रुपये खर्च करून बस डेपाे बांधला जाणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर अाला अाहे. २० हजार २४५ चाैरस मीटर इतक्या क्षेत्रावर हा डेपाे असणार अाहे.

Trending