आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या संवेदनशील भागातील रस्त्यावरून 100 अतिक्रमणे 50 वर्षांनंतर हटवली, 50 फूट रस्ता मोकळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील संवेदनशील असलेल्या तांबापुऱ्यातील मासळी बाजारात गेल्या ५० वर्षांत प्रथमच अतिक्रमण हटाव माेहीम राबवण्यात अाली. नकाशावरील ६० फुटी रस्त्यावरचे १५ ते २० फुटांपर्यंतची सुमारे १०० अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात अाली. किरकाेळ वाद व विराेध वगळता अतिक्रमणावर जेसीबीचा दणका दिला. पाेलिस बंदाेबस्तात पालिका प्रशासनाने कधीही शक्य नसलेली माेठी कारवाई केली अाहे. पाचाेऱ्याहून अाैरंगाबाद जाण्यासाठी हा शाॅर्टकट रस्ता असून, यामुळे किमान पाच किमीचे अंतर कमी हाेणार अाहे.


महापालिकेने गेल्या काही दिवसांत शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची माेहीम हाती घेतली अाहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते अतिक्रमणमुक्त केल्यानंतर अाता पालिका प्रशासनाने उपनगर व झाेपडपट्टी भागात अतिक्रमणाने व्यापलेल्या भागात कारवाई सुरू केली अाहे. महासभा असाे की स्थायी समिती सभा नेहमीच तांबापुरा परिसरातील अतिक्रमणाचा विषय चर्चेचा राहताे. लाेकप्रतिनिधींचा वाढलेला राेष व प्रशासनावर काम न करण्याचा ठपका यामुळे बुधवारी सकाळी तांबापुऱ्यात अतिक्रमण काढण्याची माेहीम हाती घेण्यात अाली. कामगार वर्ग असाे की मेहरूण भागातील नागरिकांच्या वापराचा; परंतु अत्यंत दाटीवाटी असलेल्या शिरसाेली नाका ते महादेव मंदिर रस्त्यावर (मासळी बाजार) सकाळी अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात अाली.


पालिकेच्या नकाशावर मच्छीबाजाराचा ६० फुटी रस्ता प्रत्यक्षात मात्र केवळ ३५ फुटांपर्यंत राहिला हाेता. काही वर्षांत प्रशासनाकडून डांबरीकरण करताना ९ ते १२ मीटर रस्ता डांबरीकरण करण्यात अाला हाेता. त्यामुळे रहिवाशांनी बांधकाम करताना दाेन्ही बाजूने १५ ते २० फुटांपर्यंत अतिक्रमण केले हाेते. त्यामुळे रस्ता वापरण्यासाठी निम्मा झाला हाेता. माेहिमेत पालिकेचे अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या नेतृत्वात ३० ते ३५ कामगार सहभागी झाले हाेते. एक जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने अतिक्रमणात ताेडलेला मलबा उचलण्यात येत अाहे. मागणीपेक्षा जास्त पाेलिस बंदाेबस्त देण्यात अाला हाेता.


गटारीचे स्थलांतर करावे 
अतिक्रमण काढल्यानंतर अाता महापालिका प्रशासनाने तातडीने मलबा उचलून गटारींचे स्थलांतर करून नव्याने उभारणी करावी, अशी मागणी हाेत अाहे. यामुळे पुन्हा अतिक्रमण वाढणार नाही. तसेच विजेचे खांब स्थलांतर केल्यास अतिक्रमणधारकांना फायदा हाेणार नाही, असे स्थानिकांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या गटारीमध्ये घाण साचल्याने चाेकअप झाल्या हाेत्या. सांडपाण्यालाही यामुळे वाट मिळाली अाहे. वाहनधारकांसाठी शाॅर्टकट: महामार्गाच्या दक्षिणकेडील भागातून तसेच पाचाेऱ्याकडून येणाऱ्या नागरिकांना अाैरंगाबाद जाण्यासाठी थेट इच्छादेवी चाैकाकडून अजिंठा चाैकमार्गे एमअायडीसी तसेच अाैरंगाबादला जाता येते; परंतु अाता शिरसाेली नाक्याकडून मेहरूणमधील महादेव मंदिराकडून थेट हाॅटेल कस्तूरीकडे जाण्याचा माेठा रस्ता उपलब्ध हाेणार अाहे. यामुळे वाहनधारकांचा सुमारे पाच किमीचा फेरा टळणार अाहे.


पंधरा दिवसांपूर्वी मार्किंग
अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्या अादेशानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅनमधील रस्त्याची माेजणी प्रत्यक्षात केली हाेती. तसेच मार्किंग करून अतिक्रमण निश्चित केले हाेते. त्यानुसार कारवाईची दिशा ठरवण्यात अाली अाहे.


वादाचे उगमस्थान उद‌्ध्वस्त 
तांबापुरा परिसरात नेहमीच किरकाेळ कारणावरून वाद हाेत असताे. अनेकदा दगडफेकीच्या घटनाही घडल्या अाहेत. या वादाचे मूळ उगमस्थान मच्छीबाजार चाैक असल्याचे सांगण्यात अाले. या ठिकाणावरून सुरू झालेल्या किरकाेळ वादाला वेळप्रसंगी गालबाेट लागते. महापालिकेने पाेलिस बंदाेबस्तात याच ठिकाणची काेंडी लक्षात घेता अतिक्रमणावर जेसीबी चालवले.


अतिक्रमण अधीक्षक नियुक्त, पक्की घरे ताेडल्याने किरकाेळ वाद 
शिरसाेली नाक्याकडून कारवाईला सुरुवात झाली. या वेळी अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी थेट अतिक्रमणात पक्के बांधकाम केले हाेते. अनेकांनी खाेल्या बांधल्या हाेत्या. तर अनेकांनी शाैचालय व बाथरूम बांधले हाेते. ते ताेडल्याने किरकाेळ वादाचे प्रकार घडले.


डी-मार्ट ते इच्छादेवी रस्ता वर्दळीचा अाहे. या रस्त्यावरील विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी करून दुभाजक टाकण्याचे काम लवकरच सुरू हाेईल. तांबापुरा व इच्छादेवी राेडवरील अतिक्रमण काढण्याची माेहीम संपल्यानंतर तातडीने बेसमेंटमधील कारवाई केली जाणार अाहे. संबंधित मार्केटमधील दुकानदारांना दिलेल्या नाेटीसची मुदत संपली. कारवाई अटळ अाहे. -चंद्रकांत डांगे, अायुक्त


३५ महापालिका कर्मचारी, ११ पोलिस अधिकारी तैनात
डी-मार्ट ते इच्छादेवीपर्यंतच्या रस्त्यावरही काेंडी हाेते. ती टाळण्यासाठी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गुरुवारी कारवाई करणार अाहे. दरम्यान, या माेहीमेला कुठेही गालबाेट लागू नये म्हणून चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...