आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजय उपाध्याय
लखनऊ : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याला सोमवारी एक महिना पूर्ण होईल. या महिनाभरात अयोध्येतील परिस्थितीत तर बदल झाला, परंतु अपेक्षित पायाभूत विकासाच्या दृष्टीने बदल दृष्टीपथात दिसत नाही. दुसरीकडे अयोध्येत काही प्रमाणात का होईना नवीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने अयोध्येत आधुनिक धार्मिक नगरी साकारण्यासाठी ५० हजार कोटींची योजना तयार केली आहे. त्याला अद्याप मंजुरी बाकी आहे. प्रशासनाने अयोध्या नगरपालिकेत नवीन ४१ गावांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सरकारला पाठवला आहे. ३० डिसेंबरपर्यंत त्यास मंजुरी मिळू शकते. अयोध्येत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशभरातील मोठे धार्मिक व सामाजिक ट्रस्ट अयोध्येत धर्मशाळा, वसतिगृह, हॉटेल व्यवसायासाठी जागेचा शोध घेत आहेत. श्री रामजन्मूभूमी परिसराजवळ अमांवा मंदिरात राम रसोई लंगर सुरू झाले आहे. पर्यटनमंत्री डाॅ. नीलकंठ तिवारी यांनी अयोध्येत २०० खोल्यांचे हॉटेल उभारण्यासाठी जमिनीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. रामलल्लाच्या दर्शन-पूजनासाठी सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे निर्देश लागू केले. व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाही. दर्शनासाठी अडचणी आहेत.
६७ एकरवर मंदिर, शरयू किनारी २००० एकरमध्ये इक्ष्वापुरी शहर...
धार्मिक नगरी : रामाची २५१ मीटर उंच मूर्ती, रामायणातील विविध पैलूंवर आधारित चित्र
- ६७ एकरमध्ये राममंदिर निर्माण. येथे राम दरबार, प्रसादालय असेल.
- शरयू नदीच्या किनारी २ हजार एकरमध्ये ग्रीन सिटी इक्ष्वाकुपुरी वसवणार. त्याची पायाभूत रचना राज्य सरकार तयार करेल. उर्वरित लोकसहकार्यात होईल.
- अयोध्येत २५१ मीटर उंच भगवान श्रीरामाची मूर्ती स्थापन करणार.
- भारताचा सांस्कृतिक वारसा रामायणातील पैलूंचे दर्शन घडवणारी चित्रे
- प्रमुख ठिकाणांवर अर्बन हट उभारणार
मार्ग : एक महामार्ग सहापदरी, दुहेरी चार बनणार, पाच प्रमुख मार्गाने जाता येईल
- गुप्तार घाट-शरयू पूल व नवीन शरयू पूल-पुराकलंदर मार्ग अयोध्येच्या विकासाचा पाया असेल.
- अयोध्येला जाणारे प्रमुख मार्ग- लखनऊ-अयोध्या, बस्ती-गोरखपूर-अयोध्या, प्रयागराज-सुलतानपूर-अयोध्या, वाराणसी-जौनपूर-आंबेडकरनगर-अयोध्या, रायबरेली-अयोध्या हे असतील.
- सहादत गंज, अयोध्या एनएच सहा पदरी, अयोध्या सुलतानपूर-प्रयागराज, अयोध्या-रायबरेली चार पदरी.
परिवहन : ६ रेल्वे पूल व एक आंतरराष्ट्रीय विमानतळ
- अयोध्येत ६ रेल्वे उड्डाणपूल करणार
- अयोध्या, फैजाबाद रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण, दुरुस्ती केली जाणार. रेल्वेस्थानक परिसरात सुविधांचा विकास करणार अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार. येथून कमर्शियल उड्डाणांचे संचालन होणार.
पाणी : धरण बनवणार, बंधाऱ्यांचे बांधकाम करणार
- सिंचन विभाग अयोध्या-गोंडा क्षेत्रात बंधारा बांधणार.
- गुप्तार घाटापासून जम्थरापर्यंत कच्चा बंधारा बांधला जाणार.
- वॉटर ट्रिटमेंट प्लँट व रिव्हर फ्रंट
- फैजाबाद भागातील नाल्याचे बांधकाम केले जाणार आहे. अयोध्येच्या महत्त्वाच्या भागात डबल शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम करणार.
सुरक्षा : जवानांसाठी घर, पर्यटकांसाठी ठाणेही असेल
- श्रीराम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस, पीएसीचे जवान, अधिकाऱ्यांसाठी अयोध्येत घरे बांधण्याची योजना.
- १.२५ चौरस मीटरमध्ये ठाणे बनवणार येथे महिला ठाण्याचे प्रशासकीय भवन असेल. पर्यटन ठाणेही. ६०० जणांची बराकी असेल.
बांधकाम रामनवमीपासून सुरू करण्याची मागणी, विरोधही
राममंदिर निर्माणासाठी वास्तू-नक्षत्रशास्त्रींचे पथक काम करत आहे. त्यात विहिंपचे लोकही आहेत. काही संत चैत्र रामनवमीपासून मंदिर बांधकामास प्रारंभ करण्याची मागणी करत आहेत. काहींनी या मुहूर्ताला विरोध केला आहे.
पेच अजून कायम : संसद सत्रात ट्रस्ट विधेयकास मंजुरीची शक्यता धूसर
राममंदिरासाठी ट्रस्टचा आराखडा, आकार-प्रकारावर विचारविनिमय सुरू आहे. ट्रस्टच्या स्थापनेत आणखी काही अवधी लागू शकतो. कारण संसदेच्या चालू अधिवेशनात ट्रस्टसंंबंधी विधेयक मंजूर होण्याची शक्यता धूसर आहे. या विधेयकासाठी मकरसंक्रांती अर्थात १४ जानेवारीनंतर विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. विहिंपच्या सूत्रानुसार ट्रस्टच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकांना गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. परंतु ट्रस्टचा आराखड्याला अंतिम स्वरूप मिळू शकले नाही. त्यामुळे दावेदारांच्या संख्येत वाढ झाली. ट्रस्टचे सल्लागार मंडळातील नावे जवळपास निश्चित आहेत. त्यात पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्री असतील. कार्यकारिणी सदस्यांवर घोडे अडले आहे. रामलल्ला विराजमानचे वकील मदनमोहन पांडे म्हणाले, ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर चित्र वेगाने पालटेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.