आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार दुष्काळी मदत द्या :अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्धाअधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्राच्या पथकाची वाट पाहण्याऐवजी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. भारनियमनामुळेही ग्रामीण भागातील जनतेला फटका बसत असल्याचे सांगत दुष्काळावर उपाययोजना करताना सरकार दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.     

 

अशा परिस्थितीत आपल्याला राजकारण करायचे नाही. दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला मदत करण्याची तयारी सरकारने दाखवली तर विरोधक असलो तरीही साहाय्य करू, असे स्पष्ट करतानाच त्यांनी भाजपच्या कारभारावर हल्ला चढवला. ते म्हणाले, राज्यातील २०१ तालुके व २० हजार गावे आणि १३ जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई असताना शिर्डीत पंतप्रधान मोदी यांनी दुष्काळमुक्त जाहीर केलेली १६ हजार गावे कोणती? हे सरकारने स्पष्ट करावे व आकड्यांचा खेळ करणेही थांबवावे.  जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांना राग येतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

राज्यातील धरणांची स्थिती अत्यंत बिकट असून पुढील ८ महिन्यांत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करताना नियोजनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांऐवजी तहसीलदारांकडे द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळी भागातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना रोहयोमधून कामे देऊन मजुरीची रक्कम ३५० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   

 

राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे

राज्य दुष्काळात होरपळून निघाले असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास मात्र विलंब करत असून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर न करणे हे शेतकऱ्यांचे शोषण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.  

 
ते म्हणाले, राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता सरकारने थेट दुष्काळच जाहीर करून तातडीने उपाययोजनांना सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, फडणवीस सरकारला अटी आणि निकषांच्या विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे अनावश्यक अटी व निकषांची पूर्तता झाल्याशिवाय हे सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत देणार नाही, असा आरोपही विखेंनी  केला.     
महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यापासून दुष्काळाची स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. पण, सरकार झोपेचे सोंग घेऊन ढिम्म बसले होते. या सरकारने ज्या मराठवाड्यात जलयुक्त शिवारच्या अफाट यशाचे ढोल बडवले, त्याच मराठवाड्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. कठोर निकषांमुळे आज राज्यात अनेक तालुक्यांतील शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला. पण तिथे फक्त लोहारा-भूम परिसरात मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. अवघा लातूर प्रचंड संकटात आहे. पण फक्त शिरूर अनंतपाळला मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.   

 

 

 पुढील स्लाइड्वर पहा, संबंधित माहिती 

बातम्या आणखी आहेत...