Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 507 bikes theft in last year

एकाच वर्षात लांबवल्या सव्वा कोटीच्या ५०७ दुचाकी; दोन वर्षांत ९२० दुचाकींची चोरी

अरुण नवथर | Update - Aug 27, 2018, 11:26 AM IST

शहर व जिल्ह्यात एकाच वर्षात सुमारे सव्वा कोटी रुपये िकमतीच्या तब्बल ५०७ दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या. दुचाकी चोरीच्या गुन

 • 507 bikes theft in last year

  नगर- शहर व जिल्ह्यात एकाच वर्षात सुमारे सव्वा कोटी रुपये िकमतीच्या तब्बल ५०७ दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दोन वर्षातील हा आकडा नऊशेच्याही पुढे गेला आहे. यावरूनच जिल्ह्यात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांना मात्र या रॅकेटपर्यंत पोहचण्यात अद्याप यश आलेले नाही.


  शहर व जिल्ह्यातून दररोज सरासरी दोन दुचाकी वाहनांची चोरी होत असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतात. खून, दरोडा, अत्याचार या मोठ्या गुन्ह्यांचे तपास लागतात. मात्र, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत आहेत.


  गेल्या दोन वर्षात सुमारे दोन कोटी रुपयांच्या तब्ब्ल ९२० दुचाकींची चोरी झाली अाहे. मागील वर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जुलै २०१७ ते १८ या कालावधीत तब्ब्ल ५०७ दुचाकी चोरीला गेल्या असून त्यापैकी केवळ ८१ गुन्ह्यांचा तपास लागला. नगर शहर व जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे दररोज दोन ते तीन गुन्हे दाखल होत असले, तरी पोलिस या दुचाकी चोरांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळेच या गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.


  स्थानिक गुन्हे शाखा व कोतवालीचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी काही दिवसांपूर्वीच मोठी टाेळी पकडून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतरही दुचाकी चोरीचे सत्र थांबलेले नाही. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण व त्या तुलनेत पोलिसांनी केलेला तपास यात मोठी तफावत आहे. दोन वर्षात केवळ १८१ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले, उर्वरित ७३९ दुचाकींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दित हे प्रमाण सर्वाधिक आहे. दररोज दाखल होत असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी अद्याप कोणतेच ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे दुचाकी चोरांची हिंमत वाढली असून ते आता भरदिवसा दुचाकी लांबवत आहेत.


  सर्वसामान्य नागरिक पै-पै जमवून, कर्ज काढून दुचाकी खरेदी करतात. मात्र, रात्री घरासमोर लावलेली दुचाकी सकाळी जागेवर असेल की नाही, याची खात्री नगरकरांना नाही. कामाच्या ठिकाणी व बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दुचाकी चोरीची धास्ती निर्माण झाली आहे. तक्रार देवूनही पुढील तपास होत नाही. चोरलेल्या दुचाकीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तक्रारदारांना मनस्ताप सहन करावा लागतो.


  १५ ते २२ हजारांपर्यंत किंमत
  दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिक तक्रार देतात. फिर्याद नोंदवून घेताना त्यात दुचाकीची िकंमत सरासरी १५ ते २२ हजार रुपयांपर्यंत दाखवली जाते. त्यानुसार गेल्या दोन वर्षात सुमारे दोन कोटी रुपयांच्या दुचाकी चोरीला गेल्याचे स्पष्ट होते. चोरीला गेलेल्या या दुचाकीचे काय झाले, याचे उत्तर पोलिसांनाही देता येत नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदारही फिर्याद देवून चोरीला गेलेल्या दुचाकीचा नाद सोडून देतो. परिणामी दुचाकी चोरीची फिर्याद पोलिस दप्तरी केवळ कागदोपत्रीच उरते.


  ग्रामीण भागात होते विक्री
  ४० ते ५० हजारांच्या चोरीची दुचाकी अवघ्या १० ते १५ हजारांत विकली जाते. चोरीच्या या दुचाकींना ग्रामीण भागात मागणी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. सुरूवातीला दुचाकीचा सौदा होतो, मिळेल ते पैसे पदारात पाडून संबंधित चोरटा अथवा एजंट निघून जातो. काही वेळा दुचाकीचे पार्ट सुटे करून त्यांची विक्री केली जाते. पॉकेटमनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या काही महाविद्यालयीन तरुणांवरही कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत.

Trending